मोहाडी : तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मोहाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.बी. राठोड यांनी दिली. याबाबत सर्व शाळाप्रमुख व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.मोहाडी तालुक्यात अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये भौतिक सुविधांचा अभाव तसेच विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेची कमतरता यासारख्या अन्य समस्या असल्याची नागरिकांची ओरड असल्याने मोहाडी तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खासगी व्यवस्थापन अंतर्गत अस्तित्वात असलेल्या सर्व प्रकारच्या शाळांची शत प्रतिशत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक शाळांची तपासणी करण्यासाठी विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांचे पथक तसेच माध्यमिक शाळांची तपासणी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती व तज्ज्ञ मंडळीचे पथक गठीत करण्यात आले आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत पथकांना अधिसूचित करण्यात आले आहे.शालेय तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, सर्वकष मूल्यमापन, क्षमता चाचणी, शालेय पोषण आहार, मागासवर्गीय विद्यार्थी गणवेश वाटप योजना, अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी पुरक मार्गदर्शन, शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन वयोमानानुसार प्रवेश देणे, विद्यार्थी लाभाच्या शिष्यवृत्तीसह अन्य योजना, तसेच शासन प्रशासनाने सुरु केलेल्या विविध शैक्षणिक योजनांच्या अद्यावत असलेल्या अभिलेखांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येणार असून तपासणीच्या वेळी शाळा प्रमुख व अधिनस्त कर्मचाऱ्यांनी सर्व प्रकारची अभिलेखे अपडेट करून तपासणी पथकाच्या पटलावर ठेवून सहकार्य करणे गरजेचे आहे.तपासणी प्रसंगी ज्या शाळांमध्ये अनियमितता आढळून येईल त्या शाळांच्या शाळा प्रमुखांना जबाबदार धरून रितसर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल अशी माहिती गटशिक्षणाधिकारी एस.बी. राठोड यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
शाळा तपासणी मोहीम राबविणार
By admin | Updated: January 29, 2015 23:02 IST