भंडारा : काेराेना महामारीने सर्वच क्षेत्रात हाहाकार माजविला. शिक्षण क्षेत्रही त्यातून सुटले नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेवरही परिणाम झाला. किंबहूना पालकही याला बळी पडल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात इयत्ता पहिली ते दहावीचे लाखाे विद्यार्थी आहेत. अशात काेराेनामुळे शाळा बंद पडल्या व त्याचा विपरीत परिणाम मानसिक अवस्थेवर पडत आहे. पाल्यांची चिडचिड वाढली असून, पालकांचेही टेन्शन त्यातून बळावल्याचे दिसून येत आहे. यासाठी विविध उपाययाेजनेची गरज आहे.
दीड वर्षांपासून काेराेना महामारीने शाळा सुरू झाल्या नाहीत. अशा स्थितीत मनावर परिणाम जाणवणे शक्य आहे. विद्यार्थीही घरात काेंडले गेले. ऑनलाईन शिक्षणाने सर्वच बाबींचा उलगडा हाेऊ शकत नाही. पाल्यांच्या काेंडीने पालकही विवंचनेत सापडले असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अधिक चिंताही प्रकृतीवर विशेषत: मानसिक तणावाचे कारण ठरत असते.
- डाॅ. रत्नाकर बांडेबुचे, मानसाेपचार तज्ज्ञ, भंडारा
शाळा बंद असल्यातरी ऑनलाईन शिक्षणाने मुलांना घरातच बंधिस्त केले आहे. वाजवीपेक्षा जास्त माेबाईलचा वापर वाढला आहे. डाेळ्यांवर ताण तर येताेच; पण अन्य बाबींवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. मानसिक दबाव वाढल्याचेही समजते.
पाल्यांची चिंता पालकांच्या समस्येत अधिकच भर घालणारी ठरली आहे. अनेक पालकांना नवीन माेबाईल घेऊन द्यावे लागले. इंटरनेटचा खर्च वेगळाच, याशिवाय मुलांच्या समस्या जशाच्या तशा आहेत. यावर समाधान काढणे गरजेचे आहे.