मोहाडी : सरावाने विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृध्दी होते याची जाणीव ठेवलेल्या मोहाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने या वर्षीपासून मुख्य शिष्यवृत्ती परिक्षेपूर्वी सराव परिक्षा घेण्याचा स्तूत्य उपक्रम सुरु केला आहे. त्या कौतुकास्पद उपक्रमाची अंमलबजावणी १६ मार्च रोजी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केली जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी दिली.सरावाने विद्यार्थ्यांच्या अंगी निपूणता येत असते. तसेच परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही भीती राहू नये. परीक्षेत येणाऱ्या प्रश्नाचा सराव केला तर विद्यार्थी गुणवत्तेत आघाडी घेवू शकतो. या विचाराने प्रेरित झालेल्या पंचायत समिती मोहाडीच्या शिक्षक विभागाने इयत्ता ४ थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांची सराव परिक्षा घेण्याचा उपक्रम या वर्षीपासून सुरु केला आहे. याची सुरुवात सोमवार १६ मार्च पासून सर्व शाळांमध्ये केली जाणार आहे. तालुक्यात विविध परीक्षा केंद्रावर इयत्ता ४थी व ७ वीच्या परीक्षा घेतल्या जातात. त्याच धर्तीवर दि. १६ मार्च रोजी सर्व जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये सराव परिक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते १२ वाजतापर्यंत पहिला पेपर १ ते २ वाजतापर्यंत दुसरा पेपर व दुपारी ३ ते ४ वाजतापर्यंत तिसरा पेपर घेतला जाणार आहे. या सराव परीक्षेवर निगरानी ठेवण्यासाठी केंद्र प्रमुखांना तीन शाळांना भेटी द्यायच्या आहेत. तसेच शिक्षक विस्तार अधिकारी यांनी दोन शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याच दिवशी तालुका शिक्षण विभागाला अहवाल सादर करायचा आहे. सराव परीक्षेपूर्वी प्रत्येक जिल्हा परिषदांच्या शाळेत सराव परीक्षेचे पेपर सीलबंद करुन मुख्याध्यापकांना पाठविण्यात आल्या आहेत. परीक्षेपूर्वी १५ मिनीटा अगोदर ते सीलबंद पेपरचे लिफाफे विद्यार्थ्यांसमक्ष मुख्याध्यापकांना फोडायचे आहेत. त्यानंतर शाळेत सराव परिक्षा घेतली जाईल. सराव परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना मुख्य शिष्यवृत्ती परीक्षा व स्थानिक शाळेत सराव परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मोफत प्रश्नसंच प्रत्येक विद्यार्थ्यांना पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी त्या प्रश्नसंचाचा पुरेपूर उपयोग करीत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
गुणवत्तेसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा
By admin | Updated: March 16, 2015 00:26 IST