लाखांदूर : सेवानिवृत्त शिक्षकांना पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी दर सहा महिन्यातून एकदा सरपंच किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीच्या अनुषंगाने हयात असल्याचा दाखला जोडणे आवश्यक असते. अशाच एका सेवानिवृत्ती शिक्षकाचा दाखला लाखांदूर येथील सरपंचाने काढून अपमान केल्याची घटना लाखांदूर येथे घडली.शासनाचे १५ मे १९८७ च्या परिपत्रकानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी दर सहा महिन्यातून एकदा सरपंच किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या सहीचा हयात असल्याचा दाखला पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पूरविणे गरजेचे असते. त्यादृष्टीने लाखांदूर येथील अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सरपंचाकडे दाखल्यासाठी पायपीट करतात. परंतू सेवानिवृत्त शिक्षक व सामान्य नागरिकांना वारंवार त्रास देण्याचा हेतू मनात बाळगून असणाऱ्या येथील सरपंचाने आज अचानक एका लाखांदूर येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा हयात असल्याचा हा दाखला सही करून झाल्यानंतर अनेक नागरिकांसमोर फाडून हवेत भिरकावून सेवानिवृत्त शिक्षकाचा अपमान केला.आधीच सदर ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने ग्रासली असून दलित वस्तीच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असताना हा प्रकार सध्या गावकऱ्यांत चर्चेचा ठरला आहे. कामासाठी दररोज अनेक लाभार्थी व गावकरी सरपंचाकडे येत असतात. मात्र त्यांचे वेळेवर समाधान होत नसल्याने सरपंचाच्या घरापर्यंत सामान्य नागरिकच नाही तर तेथील कर्मचाऱ्यांना सध्याकरीता घरी बोलावून शासकीय कागदावर सह्या केल्या जातात. ग्रामपंचायत स्तरावरचे अनेक महत्वाचे व शंकेला पेव फुटणारे दस्ताऐवज घरीच राखून ठेवल्याची माहिती नाव न सांगणाऱ्या अटीवर एका कर्मचाऱ्यांनी सांगितले. ग्रामपंचायत कमेटीला सहा महिन्यांचा कालावधी उरला असताना सरपंचाचा हा अरेरावीपणा सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणारा आहे. या संदर्भात सरपंचाकडून एका सेवानिवृत्त शिक्षकांच्या हयात असल्याचा दाखला फाडण्याचा प्रकार तितकाच किळसवाना असून सेवानिवृत्त शिक्षक पेन्सनर्स असोसिएशन संघटना कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
सरपंचाने फाडला हयातीचा दाखला
By admin | Updated: November 17, 2014 22:47 IST