६८ उमेदवारांची यादी तयार : निवडणुकीचे खर्च सादर न केल्याने होणार कारवाईराहुल भुतांगे तुमसर जुलै महिन्यात पार पडलेल्या १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक तसेच पोटनिवडणुकीदरम्यान रिंगणात असलेल्या ६८ उमेदवार तसेच निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित सदस्य व विद्यमान सरपंचांनी निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेत जमाखर्च सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर पदमुक्त होण्याची वेळ आली आहे.तुमसर तालुक्यातील पौनारखारी, येदरबुची, आंबागड, स्टेशनटोली, तुडका, महालगाव, नवरगाव, मांढळ, पिपरा, कवलेवाडा, चुल्हाड, पिपरीचुन्नी, लेंडेझरी, आलेसूर, गोंडीटोला, सुकळी नकुल, पांजरा (दे.) या १८ गावात ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व पोटनिवडणूक जुलै २०१५ मध्ये घेण्यात आली. १४८ जागेकरिता एकूण ३४८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. २७ जुलै रोजी या निवडणुकांचा निकाल लागला. त्या निकालाच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत निवडणूक रिंगणात उभे असलेल्या सर्व उमेदवारांनी २७ आॅगष्टपर्यंत या निर्वाचित कालावधीत निवडणुकीत केलेला जमाखर्च सादर करणे बंधनकारक होते, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. तसे न केल्यास सदर उमेदवारांवर निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, सहा वर्षाकरिता त्या उमेदवाराला कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही, असे ग्रामपंचायत अधिनियमनात नमूद आहे. मात्र निवडणुकीत उभे असलेल्या ३४८ उमेदवारांपैकी केवळ २८० उमेदवारांनी जमाखर्च सादर केले नाही. त्या ६८ उमेदवारांमध्ये बहुतांश पराभूता उमेदवारांचा समावेश असला तरी निवडणुकीत जिंकून आलेले नवनिर्वाचित सदस्य तसेच विद्यमान सरपंच पदावर आरुढ व्यक्तीचाही समावेश आहे. त्यात पवनारखारी येथील ११ उमेदवार, आंबागड येथील ४, तुडका १, महालगाव ६, येदरबुची ८, नवरगाव १, पिपरा ५, चिचोली २, कवलेवाडा ५, चुल्हाड १, पिपरीया ३, गोंडीटोला २, सुकळी नकुल १, पांजरा रेंगेपार १, आलेसूर ११, लेंडेझरी येथील ६ उमेदवारांचा समावेश आहे. या गावातील विद्यमान सरपंच व सदस्यांनाही पदमुक्त होण्याच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याने थंडीत घाम फुटण्याचा प्रकार दिसून येते. सध्या गावागावांत पदमुक्त होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
सरपंच, सदस्य पदमुक्त होणार?
By admin | Updated: November 2, 2015 00:47 IST