पवनी : शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु असलेला वाळू तस्करीचा अवैध व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. यामध्ये दररोज लक्षावधी रुपयांची उलाढाल होत आहे. यात महसुल अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याने अनेकांचे फावले आहे. भर वस्तीत भाईतलाव वॉर्ड परिसर या व्यवसायाचे केंद्र असल्याने धुळीच्या प्रदूषणामुळे जनता त्रस्त झाली आहे. येथील वैनगंगा नदीच्या वाळूमध्ये ०.५० ते २ टक्के पर्यंत मातीचे प्रमाण असल्यामुळे ही वाळू चांगल्या प्रतीची मानली जाते. त्यामुळे येथील वाळूला विदर्भात दूरपर्यंत मागणी आहे. येथील वाळू सर्वात अधिक दररोज मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात जाते. मागील वर्षापासून येथील नदीघाटांचे लिलाव न झाल्यामुळे वाळूचा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मध्यंतरी या व्यवसायविरुद्ध आवाज उठल्यामुळे प्रशासनाने काही प्रमाणात निर्बंध आणले होते. पण या रेतीमाफियांनी यावर नवीन शक्कल शोधून काढली. रेतीमाफिया हे रात्रभर नदीतून वाळूचा उपसा करून अनेक ठिकाणी साठा करून रात्रंदिवस वाळूची विक्री करीत आहेत. ही वाळू पवनी, इटगाव, येनोळा, गुडेगाव आदी रेतीघाटावरून उपसा करण्यात येत आहे. या अवैध धंद्याचे मुख्य केंद्र शहरातील भाईतलाव वॉर्डातील भर वस्तीत आहे. येणारे जाणारे वाळूचे वाहने धुळ उडवीत असल्याने व येथे साठा केलेल्या वाळूमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होत आाहे. येथील रहिवाशांनी या संबंधी तक्रार प्रशासनाला केल्यावर तात्पुरती कारवाई करण्यात आली. या गोरखधंद्यात लक्षावधी रुपयांची उलाढाल होत आहे. प्रशासनाचा वचक नसल्याने वाळू माफियांची दादागिरी वाढली आहे. या वाळूमाफियांनी शासकीय कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली आहे. अनेक वेळा पत्रकारांनाही त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन करून त्यांना धमक्या दिल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
वाळूचा अवैध व्यवसाय जोरात
By admin | Updated: January 18, 2015 22:39 IST