चुलबंद नदीतील प्रकार : लाखोंचा महसूल बुडालादिघोरी/मोठी : येथील चुलबंद नदी पात्रातील वाळू विक्रीसाठी विविध संस्थेकडे वर्ग केले आहे. दिघोरी(मोठी) रेती, पळसगाव, नर्व्हे रेती घाट व पाथरी रेती घाट या घाटांपैकी पाथरी व पळसगाव रेतीघाटांचा लिलाव झाला. मात्र दिघोरी व नर्व्हे घाटांचा लिलाव होऊ शकला नाही. याच संधीचा फायदा घेत पाथरी घाटाच्या कंत्राटदारांनी नर्व्हे घाटातील रेती विक्रीचा गोरखधंदा सुरु केला आहे. दिघोरी/मोठी येथून वाहत असलेल्या चुलबंद नदी तिरावरील वाळूला विशेषत: गोंदिया जिल्हयात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या नदी पात्रातील वाळूसाठी दिघोरी, सालेबर्डी, साखरा, मालदा, कुर्झाा, झरी, बेडगाव, अर्जुनी (मोर.) इत्यादी ठिकाणावरुन वाहने येत असतात.पाथरी रेतीघाट व दिघोरी-नर्व्हे रेती घाट परिसर लागून असल्याने वाळू कंत्राटदारांनी दिघोरी-नर्व्हे घाटावर एका दिवाणजीचीनियुक्ती केली आहे. या घाटातील रेतीची विक्री मागील एक महिन्यापासून सुरु केली. त्यामुळे या घाटातील वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात आला आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडाला आहे. दुसरीकडे नदी पात्राचे सौंदर्यही हरवत चालले आहे. पाथरी घाटाचे कंत्राटदार दिघोरी-नर्व्हे रेतीघाटावरुन रेतीचा उपसा करीत असल्याची माहिती दिघोरी व परिसरातील ट्रॅक्टर मालकांना माहिती आहे. येथून विकलेल्या वाळूचा दर १०० रुपये प्रति ट्रॅक्टर कमी ठेवल्याने याच घाटावर दिवसभर ट्रॅक्टरांची वर्दळ असल्याची माहिती आहे. याची महसुल विभागाला माहिती नाही काय? असा सवाल विचारण्यात येत आहे. माहिती असेल तर या वाहतुकीला महसुल विभागाची मुकसंमती तर नव्हे ना? असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे. दिघोरी नर्व्हे या रेती घाटातील जेवढे ब्रास रेतीचा उपसा झाला असेल तेवढा महसुल शासनाने संबंधित कंत्राटदाराकडून वसुल करावा, अशी मागणी दिघोरीतील जनतेने केली आहे. (वार्ताहर)
लिलाव न झालेल्या घाटातून वाळू विक्रीचा गोरखधंदा
By admin | Updated: May 18, 2015 00:35 IST