भंडारा : जिल्ह्यात डिसेंबर २०१५ मध्ये उघडकीस आलेले सागवन वृक्षतोड प्रकरण राज्याच्या अधिवेशनात गाजणार आहे. साकोलीचे आमदार राजेश (बाळा) काशिवार यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न लावून धरला आहे. त्यामुळे आता दोषी वन अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळाले असल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये भंडारा वन विभागाच्या फिरते पथकाने सागवन वृक्षांची वाहतूक करणारे तीन ट्रक कारधा चेकपोस्टसमोर पकडले होते. चौकशीदरम्यान, परवानगी मिळालेल्या झाडांशिवाय इतरही झाडे परवानगीविना कापल्याचे संबंधित लाकूड ठेकेदाराने वन अधिकाऱ्यांसमोर सांगितले होते. लाकुड ठेकेदारांना ११७ सागवन झाडांची तोड करण्याची परवानगी मिळालेली होती. ही परवानगी उपवनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांनी दिली होती. परंतु, ठेकेदारांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्यरित्या आणखी ४१ सागवन झाडांची तोड केली.विना परवानगीने तोडलेल्या या झाडांवर सहाय्यक वनसंरक्षक डी.जे. लुटे यांचा हॅमर (हातोडा) मारलेला होता. डी.जे. लुटे यांनी नियमबाह्य असलेला माल नियमानुसार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, फिरते पथकाने हा प्रयत्न हाणून पाडला होता. या प्रकरणाची चौकशी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती. पहिल्यांदा चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक वनसंरक्षक मनोहर गोखले हे होते. परंतु, त्यांना कारवाई करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी शेख यांच्याकडे ही चौकशी आली. परंतु, त्यांनीही चौकशी करण्यास नकार दिला. आता ही चौकशी भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेश्राम यांच्याकडे आहे. चौकशीनंतर परवागनीनुसार असलेला माल सोडून देण्यात आला तर नियमबाह्य असलेला माल सरकारजमा करण्यात आला आहे. तसेच संबंधित ठेकेदारांवर दंडही ठोठावण्यात आला आहे. परंतु, जे वन अधिकारी या प्रकरणात गुंतले आहेत, त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नाही. ही कारवाई जाणीवपूर्वक थंडबस्त्यात पडून आहे. (नगर प्रतिनिधी) नियमानुसार असलेला माल सोडून देण्यात आला असून नियमबाह्य माल सरकारजमा करण्यात आला आहे. ठेकेदारांवर दंड ठोठावला असून दोषी अधिकाऱ्यांची चौकशी अद्यापही सुरूच आहे.-एन.आर. प्रवीण,उपवनसंरक्षक, वन विभाग भंडाराकाशिवार यांनी उपस्थित केलेले प्रश्नवन विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जंगलातील वृक्षांची राजरोसपणे कत्तल सुरू आहे. सदर सागवन वृक्षतोड प्रकरण उजेडात आल्यानंतर साकोलीचे आ. बाळा काशिवार यांनी हा मुद्दा विधानसभेत लावून धरला. सागवन वृक्षतोड प्रकरणात कुणावर काय कारवाई केली? गुन्हा नोंदविण्यात आला काय? सदर झाडे खासगी गटातील होते की जंगलातील होते? आरोपींची माहिती, किती माल जप्त करण्यात आला? आदी प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. भंडारा वन कार्यालयात दोन दिवसांपासून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सागवन वृक्षतोड प्रकरण विधानसभेत गाजणार
By admin | Updated: March 12, 2016 00:41 IST