सालेकसा : गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या चालढकल वृत्ती व विभागातील अंतर्गत समस्यांमुळे शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे वेळ नसल्याने शिक्षकांत रोष व्याप्त आहे. अशात शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर निकाली न काढल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शिक्षकांच्या प्रत्येक समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची आहे. मात्र येथील करभार उलट आहे. विभागात आवक-जावक विभाग सांभाळणारा कुणीही नसल्याने शिक्षकांच्या अर्जांची नोंद शिक्षण विभागात ठेवली जात नाही. शिक्षकांच्या सर्विस बुक मध्ये असलेल्या त्रुट्या दुरूस्त करून संबंधीत विभागाकडे पाठविण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची असूनही त्यात हेतूपुरस्सर दिरंगाई केली जात आहे. मार्च महिन्याच्या पगारात सहाव्या वेतन आयोगाची किस्त जमा करायची होती. मात्र विभागातील कामचुकारपणामुळे अनुदान उपलब्ध असतानाही त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. अर्जित रजेचे अर्ज व रुजू अहवाल प्राप्त होऊनही दोन वर्षांपासून अर्जित रजेच्या थकबाकीचे आदेश प्रलंबीत आहेत. मागील दोन वर्षांपासून आयकर असेसमेंट न झाल्यामुळे आयकर विभागाकडून शिक्षकांना नोटीस बजावली जात आहे. एप्रिल २०१४ पासून डीसीपीएस कपात बंद असून जेवढी कपात केली आहे त्याची नोद जिल्हा परिषदेत झालेली नसून सदर राशी वाऱ्यावर आहे. अशा अनेक समस्यांनी शिक्षक ग्रस्त आहेत. या समस्यांवर चर्चा करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदन दिले. मात्र गटशिक्षणाधिकारी तारीख न देता चालढकल करून वेळ मारून नेत ाहे. मात्र त्यांच्या या व्यवहारामुळे शिक्षकांत रोष व्याप्त असून लवकरात लवकर समस्या निकाली न काढल्यास आंदोलनाचा ईशारा समितीचे तालुकाध्यक्ष एस.बी. दमाहे, सरचिटणीस जी.सी. बघेले, कार्याध्यक्ष टी.आर. लिल्हारे, झेड.बी. उके, एम.पी. माहुले आदिंनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Updated: March 8, 2015 00:28 IST