तुमसर : जगप्रसिद्ध बाळापूर (डोंगरी बु.) खुल्या खाणीकडे जाणारा रस्ता खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे. जिल्ह्यात विकास कामांना कोट्यवधींचा निधी देणारे खाण प्रशासन खाणीकडे जाणारा रस्ता तयार करू शकत नाही. येथे दिव्याखाली अंधाराची प्रचिती येते.गोबरवाही पवनारखारी, बाळापूर तथा डोंगरी बु. ही मोठी गावे खुल्या खाण परिसरात आहेत. जगप्रसिद्ध बाळापूर येथे भारत सरकारची मॅग्नीजची खाण आहे. या मार्गावर दिवसभरातून २०० ते २५० मॅग्नीजचे ट्रक धावतात. या रस्त्याच्या अक्षरश: चिंधड्या उडल्या आहेत.विशेष हास्यास्पद हे की या रस्त्याची मालकी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेकडे नेहमीच निधीची कमतरता असते. हा रस्ता सात ते आठ कि.मी. चा आहे.काही महिन्यापूर्वी या रस्त्यावर डामरीकरणाचे काम झाले होते. या रस्त्याचे निरीक्षण केल्यावर रस्ता बांधकामात गुणवत्ता दिसतच नाही. मुरुमावर केवळ डांबराचा लेप लावल्याचे सहज दिसते. आता ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकण्यात आली आहे. खड्डे बुजयविण्याचा येथे केविलवाणा प्रकार काही दिवसात सुरु होणार आहे.भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मॉईल प्रशासनाने कोट्यवधींचा निधी दरवर्षी दिला असून देणे सुरुच आहणे. नियमानुसार मॉईल परिसरातील मूलभूत सोयी सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी मॉईल प्रशासनाची आहे. मूलभूत सोयी सुविधा पूर्ण केल्यावरच हा निधी जिल्ह्यातील इतर भागाकडे वळता करता येतो. येथे राजकीय प्रभावाने आतापर्यंत हा निधी पळविण्यात आला अशी चर्चा आहे. केंद्र व राज्यात नवीन सरकार आले आहे. या सरकारांनी निष्पक्ष चौकशी करून मॉईल परिसरात मूलभूत सोयी सुविधांचा आढावा घेण्याची गरज आहे. खा. नाना पटोले, आ.चरण वाघमारे यांनी या गंभीर विषयांकडे लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
मॉईल परिसरातील रस्ते धोकादायक
By admin | Updated: November 2, 2014 22:30 IST