आठ गावांतील गावकरी त्रस्त : निधीअभावी रस्त्याची दुरुस्ती अडलीरंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा)सिहोरा परिसरातील ग्रामीण भागात यशवंत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेली सिमेंट रस्ते खड्डेमय झाली आहेत. या सिमेंट रस्त्यावरून ये-जा करताना गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. निधीअभावी या रस्त्याची दुरुस्ती अडल्याची माहिती सरपंच यांनी दिली आहे. ग्रामीण भागात १० ते १२ वर्षापूर्वी यशवंत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते बांधकामाचे जाळे विणण्यात आली आहे. या य ोजनेने सिमेंट रस्ते बांधकामाचे स्वप्न प्रथमच गावकऱ्यांना दाखविले आहे. ८५ टक्के शासन व १५ टक्के लोकवर्गणी असे या योजनेचे स्वरुप होते. या महत्वाकांक्षी योजनेमुळे गावातील रस्ते चकाचक झाली आहेत. परंतु आता या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. सिमेंट रस्त्यावर ३ ते ४ फुट लांब अंतरचे खड्डे पडली आहेत. यामुळे गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जीर्ण रस्ते दुरुस्त्या करिता शासनस्तरावर अद्यापपर्यंत स्वतंत्र पॅकेज ग्रामपंचायतींना देण्यात आलेला नाही. शासनाने १४ व्या वित्त आयोग अंतर्गत निधी दिला आहे. परंतु या अनुदान देयकांचे शासनस्तरावर नियोजन ठरले आहे. गावे विकास व ठराविक नियोजनात प्राप्त निधी खर्च करता येत नसल्याने ग्राम पंचायतीची पंचायत सुरु झाली आहे. सामान्य फंडात जमा होणारा निधी नाही. गावकऱ्यांकडे वाढती थकबाकी व कर्मचाऱ्यांचे वेतनाचे नियोजन याच फंड अंतर्गत होत असल्याने गावात विकास कामाचा बोजवारा वाजला आहे. यशवंत ग्राम समृद्धी तथा दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेली जुने सिमेंट रस्ते जीर्ण झाली आहेत. या रस्त्याची लोखंडी रॉड बाहेर पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. सिमेंट रस्त्याचे खड्ड्यात मुरमाचा लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न ग्राम पंचायतीनी केला आहे. परंतु हा प्रयोग पावसाळा ओसरताच फसला आहे. पुन्हा गावात सिमेंट रस्त्यावरील खड्याची स्थिती जैसे थे झाली आहे. गावात आयोजित ग्रामसभेत जीर्ण सिमेंट रस्त्याचे खड्डे गाजले आहे. या रस्त्यांचा फटका सर्वाधिक शाळकरी विद्यार्थ्यांना बसला आहे. रस्ते नव्याने दुरुस्तीकरिता निधी नसल्याची ओरड सरपंचानी सुरु केली आहे. गावात नवीन विकास कामांना मंजूरी देण्यात येत असली तरी जुने आणि जीर्ण रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
यशवंत ग्राम समृद्धी योजनेचे रस्ते खड्डेमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2016 00:28 IST