भंडारा : कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात त्यांच्या संघटनांनी प्रशासनाला काम बंदचा इशारा दिलेला आहे. मात्र आता शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला १५ दिवसात समस्या निकाली काढा अन्यथा कामबंद करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या समस्या मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. यासाठी शिक्षकांच्या विविध संघटनांनी अनेकदा जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन दिली. त्यांच्या समस्यांवर केवळ आश्वासनापलीकडे काहीही मिळालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येवून त्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी शिक्षक कृती समितीची स्थापना केलेली आहे. समितीत मुबारक सय्यद, रमेश सिंगनजुडे, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार या शिक्षक संघटनांच्या नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासोबतच ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, मुकूंद ठवकर, सुधीर वाघमारे, संदीप वहिले, हरीकिशन अंबादे, नेपाल तुरकर, सुधाकर ब्राम्हणकर, रमेश पारधीकर यांचा या समितीत समावेश आहे. या समितीने आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे यांची भेट घेवून समस्या मांडल्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके आदी उपस्थित होते. या समस्यांमध्ये शिक्षकांचे एक तारखेला वेतन द्यावे, पदोन्नती संबंधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, डीसीपीएसचा हिशोब करून व्याजासह परत करावे, चटोपाध्याय प्रकरणी वरिष्ठ वेतन श्रेणी मंजुर करून यांच्यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. येत्या १५ दिवसात शिक्षकांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास शाळा बंद करण्याचा इशारा या शिक्षक कृती समितीने दिला आहे. यावेळी विकास गायधने, रमेश फटे, महेश गावंडे, धनराज वाघाये आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
मागण्या निकाली काढा अन्यथा शाळा बंद करू
By admin | Updated: September 2, 2016 00:37 IST