उके कुटुंबीयावर नियतीचा आघातभंडारा : मागील अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने दुपारी अचानकपणे हजेरी लावली. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या या पावसाने दिलासा दिला असला तरी पावसाने कोथुर्णा येथील उके कुटुंबीयावर दु:खाचे डोंगर कोसळले. घटना माहित होताच नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली व जखमी व मृतांना बघून त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांच्या आक्रोशाने उपस्थितांचीही मने पानावली.नातेवाईकाकडे असलेल्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कोथूर्णा येथील उके कुटुंब भंडाऱ्यावरून आॅटोने गावाकडे परतीच्या मार्गावर होते. आॅटोत जात असताना अचानकपणे निसर्ग कोपल्यावर मागील अनेक दिवसांपासून गायब झालेला पाऊस अचानक कोसळला. गावाच्या मार्गात असताना आॅटोतील प्रवाशांना पाऊस लागून ते ओले होत असल्याने आॅटो चालकाने दाभा वळणावरील कडूनिंबाच्या मोठ्या झाडाखाली आॅटो थांबविला. आॅटोचे कव्हर लावून प्रवाशांना सुरक्षितरीत्या घरी पोहचविण्याची मनीषा चालकाने व्यक्त केली असावी. त्या हेतूने आॅटोवर आच्छादन करीत असताना विशालकाय वृक्ष कोसळला. क्षणात काय होईल याची किंचितही कल्पना कुणाच्याही ध्यानी म्हणी नव्हती. पाहता पाहता चार जीव डोळ्यासमोर जग सोडून गेले. लहाणग्यांचा जीव श्वास कोंडण्यामुळे गेला. प्रचंड आरडा ओरड आणि वाचविण्याची धडपड त्यावेळी जाणवल्या गेली. आॅटोचा अक्षरश: चुराडा झाला. आॅटोचालक आणि मधात बसलेल्यावर काळाचा घाला एवढा प्रचंड होता की, कुणालाही वाचण्याची संधीच मिळाली नाही. मागील बाजूला बसलेल्या प्रवाशांनी दोन ते तीन सेकंदात आॅटोबाहेर उडी मारली. त्यामुळे त्यांना कुठलाही मार बसला नाही. वृक्षाच्या विशालकाय फांद्या आॅटो चालक आणि मधल्या भागावर कोसळला होता. त्यामुळे अपघाताची भीषणता मोठी होती. नशीब बलवत्तर म्हणून १० जण थोडक्यात बचावले, परंतु चौघेजण तितके नशिबवान नव्हते. वंशिका आणि रूपाली हा आघात सहन करू शकली नाही. नियतीने या बालिकांनाही हिरावून नेले. (शहर प्रतिनिधी)
मृत व जखमींना बघून नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश
By admin | Updated: October 6, 2014 23:07 IST