गोसे (बुज.) : गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ८५ प्रकल्पग्रस्त गावांचे ज्या ६४ गावठानात पुनर्वसन होत आहे. त्या गावठानाच्या शेती मालकांना १२०० कोटी रूपयाच्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याचे आश्वासन पुनर्वसन उपआयुक्तांनी गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले.गोसीखुर्द धरणाच्या बुडीत क्षेत्रातील भंडारा जिल्ह्यातील ३४ व नागपूर जिल्ह्यातील ५१ अशा एकूण ८५ गावांचे पुनर्वसन केले जात आहे. या ८५ गावांचे ६४ नवीन गावठानात पुनर्वसन होत आहे. या पुनर्वसनाच्या कामाकरीता मोठ्या प्रमाणातील शेती नवीन गावठानासाठी सरकारने भुसंपादीत केली आहे. हे पुनर्वसनाचे काम धरणाचा एक भाग आहे. या गावठान शेत मालकांना मोबदल्याशिवाय काहीही मिळाले नाही. त्यामुळे हे शेतकरी १२०० कोटी रूपयाच्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ त्यांना देण्याची मागणी करीत होते.विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात नागपूर येथे अनेक गावातील गावठानातील शेतकऱ्यांसह शिष्टमंडळाने नागपूर विभागाचे पुनर्वसन उपआयुक्त संजय गौतम, विशेष पुनर्वसन कक्ष प्रमुख उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके यांना भेटून गावठान शेतकऱ्यांना ही १२०० कोटी रूपयाच्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांनाही पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विलास भोंगाडे, अंबिर दाबडडुबके, नामदेव तितीरमारे, शैलेश चाफले, गिता निमगडे यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (वार्ताहर)
पुनर्वसित गावठानाच्या शेतमालकांना मिळणार पुनर्वसन पॅकेजचा लाभ
By admin | Updated: July 9, 2014 23:16 IST