जवाहरनगर : जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत शहापूर प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून आठ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा बंद राहत असल्याने नळ जोळणीधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने बेला येथे शहापूर प्रादेशिक पाणी पुरवठाचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. याकरिता वैनगंगा नदी पात्रालगत जलस्त्रोत निर्माण केलेले आहे. यापूर्वी ही योजना जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने चालविण्यात येत होती. दोन वर्षापूर्वी ही योजना बेला ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करण्यात आली. त्यासंबधी सन २०१४-१५ दरम्यान बेला ग्रामपंचायतीशी जिल्हा परिषदेने चालविण्यासाठी करारनामा केला होता. मात्र, सन २०१५-१६ दरम्यानचा करारनामा जिल्हा परिषदेने केलेला नाही. मागील पाण्याची थकबाकी शिल्लक असल्याची ओरड आहे. बेला जलशुद्धीकरण योजनेत आठ गावांचा समावेश आहे. यात बेला, भोजापूर, उमरी, फुलमोगरा, शहापूर, गोपीवाडा, ठाणा, परसोडी, मुजबी यांचा समावेश आहे. या पाणीपुरवठा योजनेचे देखभाल दुरुस्तीचे काम बेला ग्रामपंचायतीकडे आहे. आठवड्यातून तीन ते चार दिवस पाणी पुरवठा करण्यात येतो. तो ही अत्यल्प प्रमाणात आणि सदर ग्रामपंचायतीला पूर्ण टाकीचे पाण्याची थकबाकी पठाविली जाते.ठाणा ग्रामपंचायतीने सुमारे चाळीस हजार रुपये थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरु करण्याची विनंती केली होती. मात्र एक आठवड्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यात आलेला नव्हता. पुन्हा या महिन्यात ४० हजाराची पाण्याचे मागणी बील ग्रामपंचायतीमध्ये धडकले. आधीच सणवार असताना गावातील पाणीपुरवठा बंद असतो. तर उर्वरीत दिवशी दोन ते तीन घागर पाणी मिळते. अशी परिस्थिती असताना नळधारक कसे पैसे देणार अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये उमटत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत बेला यांच्याशी सन २०१५-१६ करिता करारनामा झालेला नाही. उलट बेला ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषदेवर देखभाल दुरुस्तीचे बील थकीत आहे. लोकप्रतिनिधींचे उदासीन धोरण व संबंधित अधिकाऱ्यांचे हेकेखोर धोरण यामध्ये सामान्य नळधारक जनता भरडली जात आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. अन्यथा पाण्यासाठी उग्ररुप धारण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)
प्रादेशिक पाणीपुरवठा ‘रामभरोसे’
By admin | Updated: September 28, 2015 00:49 IST