देव्हाडा खुर्द येथील प्रकरण : अनेकदा निवेदन देऊनही कार्यवाही नाही, पुरवठा विभागाचे दुर्लक्षकरडी (पालोरा) : देव्हाडा खुर्द येथे सुमारे ४४८ राशन कार्डधारकांची संख्या आहे. परंतु स्वस्त धान्य दुकानदार डी.बी. मुटकूरे यांच्या गैरप्रकार व अरेरावीमुळे ३२५ कार्डधारक त्रस्त आहेत. जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी, तहसिलदार मोहाडी यांना अनेकदा निवेदन, तक्रारी देण्यात आल्या. पर्यायी सुविधा, दुसऱ्या दुकानाला कार्ड जोडण्याची मागणी करण्यात आली. परंतू कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २५० कार्डधारकांनी माहे फेब्रुवारी २०१६ पासून धान्याची उचल न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावाला दुसरे नवीन दुकान देण्यासाठी आंदोलनाचा पावित्रा माजी सभापती झगडू बुद्धे व ग्रामस्थांनी घेतला आहे.मौजा देव्हाडा खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करण्यात यावी, दुकानदार डी.बी. मुटकूरे यांनी केलेल्या गैरकारभाराची दक्षता समिती समोर तपासणी करण्याची मागणी तसेच मुटकुरे यांच्या अरेरावीपणामुळे दुकानदाराच्या घरी धान्य घेण्यासाठी जाण्यास घाबरत असून पर्यायी व्यवस्था म्हणून ३२५ कार्ड जवळच्या देव्हाडा बुज येथील मेश्राम यांच्या दुकानाला जोडण्यासाठी अनेकदा जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी, मोहाडी तहसिलदार यांना निवेदन व तक्रारी देण्यात आल्या. ग्रामपंचायत कार्यालय देव्हाडा यांनी सुद्धा ३१ डिसेंबर २०१४, १ मे २०२५, ४ जून २०१५ व ११ आॅक्टोबर २०१५ रोजी धान्य दुकानदार मुटकुरे यांनी बोगस कार्डाचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याने वसुलीसह दंडात्मक कारवाही करण्याची मागणी केली. गरीब, गरजू व विधवांच्या कुटूंबांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्याची मागणी केली. ग्रामस्थ व गावकऱ्यांनी वेगवेगळ्या तक्रारी व निवेदन दिले असताना अधिकाऱ्यांनी काहीही केलेले नाही. राशन दुकानदाराला पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केला.देव्हाडा खुर्द येथील मुटकुरे स्वस्त धान्य दुकानदारामुळे सुमारे ३२५ कार्डधारक त्रस्त आहेत. याअगोदर दुकान गैरकारभारामुळे अनेकदा निलंबितही झालेले आहे. दुकानात मोठे घबाड असल्याने कार्यवाही करण्यास अधिकारी धजावत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रकरण ज्वलंत असताना साधी तपासणी होत नसल्याने गावातील २५० कार्डधारकांनी आंदोलनात पावित्रा घेतला आहे. फेब्रुवारी २०१६ पासून धान्याची उचल न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या दुकानाला कार्ड जोडण्याची मागणी सोडून गावाला नवीन दुकान देण्याची मागणी प्रामुख्याने होत आहे. (वार्ताहर)
२५० कार्डधारकांचा धान्य उचलण्यास नकार
By admin | Updated: March 13, 2016 00:38 IST