Rana in the district is only four percent | जिल्ह्यात भात रोवणी केवळ चार टक्के
जिल्ह्यात भात रोवणी केवळ चार टक्के

ठळक मुद्देअपुरा पाऊस : सात हजार २७५ हेक्टरवर रोवणी

संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने रोवणीची कामे रखडली असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ ३.८७ टक्के क्षेत्रातच रोवणी झाली आहे. अद्यापही दमदार पाऊस झाला नसल्याने रोवणी करण्यासाठी शेतकरी मागेपुढे पाहत आहेत. रोवणी लांबल्यास याचा परिणाम भात उत्पादनावर होणार हे निश्चीतच.
भंडारा जिल्ह्यात दोन लाख ३ हजार ६१६ हेक्टरवर खरीप हंगामात नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ८० हजार १२५ हेक्टर भाताचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे पºहे टाकण्यास शेतकऱ्यांना उशिर झाला. आद्रा नक्षत्रात पावसाचे आगमन झाले. परंतु तोही पुरेसा नाही. १ जून ते ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३५३ मिमी पाऊस अपेक्षीत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३९.८ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्याच्या तिसºया आठवड्यात तर भंडारा, पवनी तालुक्यात पाऊसच कोसळला नव्हता. परिणामी शेतीची सर्व कामे खोळंबली. गत आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. मात्र हा ही पाऊस भात रोवणीसाठी योग्य जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील भात रोवणीचे कामे खोळंबली आहे.
भंडारा जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टरपैकी केवळ ७ हजार २७५ हेक्टरवरच भाताची रोवणी झाली आहे. केवळ ३.८७ टक्के रोवणी झाल्याचा नजर अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यात तुरीची पेरणी ११ हजार २२ हेक्टरवर केली जाते. आतापर्यंत ९१६ हेक्टरवरच पेरणी आटोपली होती.
जिल्ह्यात अद्यापही कोणत्याही नदी-नाल्याला पुर गेला नाही. भूगर्भातील जलपातळीही वाढली नाही. शेतात चिखलनी योग्य पाऊस झाला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. रोवणी लांबल्यास भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

लाखांदूरमध्ये सर्वाधिक रोवणी
भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक रोवणी लाखांदूर तालुक्यात ८.८८ टक्के झाली आहे. २९ हजार ८६३ हेक्टर क्षेत्रापैकी २ हजार ६५१ हेक्टरवर भाताची रोवणी आटोपली आहे. सर्वात कमी रोवणी भंडारा तालुक्यात झाली असून येथे १.६१ टक्केच रोवणी झाली आहे. भंडारा तालुक्यातील २५ हजार ८३२ हेक्टर क्षेत्रात भात लागवडीचे नियोजन करण्यात आले असून केवळ ४१५ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे.

२५०० हेक्टरवर तूर
भंडारा जिल्ह्यात भातासोबतच तुरीची लागवड केली जाते. ७०६९ हेक्टरवर तुर लागवडीचे नियोजन असून आतापर्यंत २५७९ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. ३६.४८ टक्के क्षेत्रात लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड तुमसर तालुक्यातील ७४ टक्के झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.


Web Title: Rana in the district is only four percent
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.