विलास बन्सोड उसर्राबावनथडी प्रकल्पात बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या तुमसर तालुक्यातील कमकासूर गावाचे पुनर्वसन रामपूर (हमेशा) येथे करण्यात आले. पण रामपूर (हमेशा)चे पुनर्वसन विकासापासून कोसो दूर आहे.आपली जन्मभूमी कुणालाही सोडावयाचे वाटत नाही. तरीही बुडीत क्षेत्रात मोडत असलेल्या तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल क्षेत्रात असलेल्या कमकासूरचे पुनर्वसन शासन निर्णयानुसार तुमसर तालुक्यातील रामपूर (हमेशा) येथे करण्यात आले. गावकऱ्यांसाठी शासनाने जरी पर्यायी व्यवस्था करून दिली खरे पण आजही पायाभूत सुविधापासून वंचितच असून त्यांच्या विकासाला ग्रहण लागले असल्याचे चित्र दिसत आहे. गावात २०३ कुटुंब वास्तव्यास आहेत. गावात विद्युत सेवा आहे. पण कधी चालू तर कधी बंदच असते. बीपीएल योजनेअंतर्गत विद्युत सोय झाली नाही. गावातील रस्त्याचे बांधकाम कच्चे आहे. अठरा नागरी सुविधा अंतर्गत रस्ते पक्के असतात. पण तसे काही दिसत नाही. गावात पाणीपुरवठा योजना आहे. पण शुध्द पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील शाळेला आवारभिंत नाही. सदर भाग हा जंगलाने व्यापलेला असून कधीही हिंस्त्र प्राणी हल्ला करू शकतात. त्यामुळे निदान शाळेला आवारभिंतीची गरज आहे. गावात अंगणवाडीची इमारत नसल्याने कमालीची गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दुर्गम भागात वसलेले हे गाव असून येथील नागरिक आरोग्य सेवा पासून वंचित आहेत. दूरवर असलेल्या लेंडेझरी आरोग्य केंद्रावरून आरोग्य तपासणी होते. आरोग्य सेवेसाठी साधने उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करून जावे लागते. स्थानांतरीत लोकांना अद्यापही मोबदला मिळाला नाही. शासनाने एक लक्ष रुपये देण्याची घोषणा केली. ती घोषणा हवेतच विरली. अनेक सुख सुविधेपासून वंचित असलेल्या या गावात शासनातर्फे आजही कासवगतीने काम सुरु आहे. पण पायाभूत सुविधेपासून वंचित असून विकासकामाला ग्रहण लागले आहे.
रामपूर पुनर्वसन विकासापासून कोसो दूर
By admin | Updated: March 23, 2015 00:50 IST