सफाई कामगारांचे ४ महिन्यांपासून वेतन थकीत : आठ दिवसांपासून कामगारांचे काम बंद
तुमसर: गत चार महिन्यांपासून सफाई कामगारांचे वेतन थकीत असल्याने कामगारांनी काम बंद करून वेतनाची मागणी केली. मात्र, नगर पालिका प्रशासनाने व संबंधित कंत्राटदाराने कसलीही दखल न घेतल्याने माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या नेतृत्वात मंगळवारी नगर परिषदेवर हल्लाबोल केला, परिणामी पालिका प्रशासनात खळबळ उडाली.
नगर परिषद तुमसर येथे मागील ४ वर्षांपासून रामटेक येथील शारदा महिला बचत गट यांना शहरातील प्रत्येक वाॅर्डातील ओला व सुखा कचरा गोळा करण्याचे टेंडर दिले आहे. दरम्यान, कंत्राटासंबंधी तक्रारी झाल्यामुळे डिसेंबर २०१९ पासून पालिका प्रशासनाने कंत्राटदाराचे वेतन थकीत ठेवले आहे. परंतु, त्यांचे कंत्राट सुरूच होते. कामगारांचे वेतन कंत्राटदाराने जमेल तसे केले. मात्र, गत ४ महिन्यांपासून कामगारांना त्याने वेतन देणे बंद केले आहे. पालिका जोपर्यंत मला वेतन देणार नाही तोपर्यंत कामगारांना वेतन मिळणार नाही, अशी भूमिका घेतल्याने वेतनाअभावी कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. कामगारांनी ही समस्या माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या लक्षात आणून देताच कारेमोरे यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व कामगारांना घेऊन नगर परिषदेवर हल्लाबोल केला.
तिथे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, कर्मचारी कुणीही हजर नसल्याचे पाहून अभिषेक कारेमोरे यांनी पालिका गेटवर धरणे दिले. काही काळ रस्ता अडवून धरताच पोलिसांनी मध्यस्थी करून न. प. उपाध्यक्ष गीता कोंडेवार यांना बोलावून चर्चा घडवून आणली. विविध समस्या व इतर मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राजेश देशमुख, निशिकांत पेठे, नगरसेवक सलाम तुरक, तिलक गजभिये, प्रदीप भरनेकर, सुनील थोटे, बाबू फुलवधवा, सुदीप ठाकूर, अंकुर ठाकूर, सुमीत मलेवार, संकेत गजभिये, रोहित बिसने, गोवर्धन किरपाने, प्रणय ठवकर, आदित्य वनवे, अतुल कानोजे, मनीष अग्रवाल आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.