शेतकरी हवालदिल : मूग, वाटाणा, तूर, पोपट, जवस पिकाचे अतोनात नुकसान, वीटभट्टीला बसला फटकाभंडारा : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास पावसाने अवकाळी हजेरी लावली. सर्वाधिक जास्त पाऊस पवनी तालुक्यातील कोंढा येथे (३२.१ मि.मी) बरसला. भंडारा येथे १४ मि.मी, मिटेवानी १७ मि.मी., गर्रा १५ मि.मी, मासळ १३.२ मि.मी तर लाखांदूर येथे ८ मि.मी असा सरासरी ३.९ मि.मी पाऊस बरसला. या पावसाचा रबी पिकांना फटका बसणार आहे. या पावसाने उन्हाळी धानाला संजिवनी मिळणार आहे.साकोलीत पाऊससाकोली : आधीच नापिकीमुळे हवालदिल शेतकऱ्यावर पुन्हा अवकाळी पावसाने चिंता वाढविली आहे. त्यामुळे कालच्या पावसामुळे कठाण मालही होणार की नाही यात शंका आहे. यावर्षी पावसाळयातच पाऊस नाहीच्या बरोबर आला. मात्र तरीही शेतकऱ्यांनी कसेबसे करून रोवणी आटोपली. रोवणी होत नाही तेच पुन्हा किडीने कहर केला. यातूनही शेतकऱ्यांनी मार्ग काढला व पिके वाचविली. मात्र उत्पन्न अर्ध्यापेक्षाही कमी आहे. यानंतर शेतकऱ्यांना आशा होती दुष्काळग्रस्त घोषीत होण्याची. मात्र तीही निराशेतच बदलली. याहीस्थितीत शेतकऱ्यांनी कठाण मालाची लागवड केली. ज्यामुळे काही प्रमाणात नुकसानीवर आळा घालता येईल. मात्र कठाण माल आता हातात येईल अशातच अवकाळी पावसाने सुरुवात केली. अवकाळी पाऊस असाच दोन तीन दिवस आला तर या पावसाचा परिणाम रबी पिकावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मासळ येथे जोरदार पाऊसमासळ : मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. सायंकाळी ६ पासूनच गार वारे वाहू लागले होते. रात्री वादळासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे रात्रभर वीज पुरवठा खंडीत झाला होता. या पावसाने रबी पिकाला फटका बसला आहे. शेतात गहू, उडीद, मुग, तुर काही प्रमाणात कापणीला आले होते. काही पीक शेतकऱ्यांनी शेतातच जमा करून ठेवले होते. अचानक आलेल्या पावसाने वाळलेले पीक ओले झाले. गव्हावर विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. गव्हाची चकाकी जावून गव्हाला भाव येत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पुन्हा पाऊस आल्यास शेतकऱ्यांना फटका बसण्याची चिन्हे आहेत. उडीद, मुग आदींना ओंबीवर आल्यामुळे नुकसान होऊ शकते. दमट वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे.करडीत मुसळधारकरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील पालोरा व करडी परिसरात सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे शेतीचे नुकसान झाले. पोपट, जवस, मुंग आदी पिके काळी पडली. गहू हवेमुळे जमिनीवर लोटले. विटभट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पालोरा येथील शेतकरी देवदास बडवाईक, लक्ष्मण बांते यांच्या शेतातील मुग काळे पडले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.रबी पिकांची नासाडीविरली (बु.) : या परिसरात अकाली पावसाने हजेरी लावली. पावसाच्या तडाख्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हताश झाला आहे. परिसरात उडीद, मुग, लाख, लाखोळी, वाटाना, हरभरा, गहू आदी रबी पिकांच्या कापणीचा हंगाम जोमात सुरु आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात या रब्बी पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत तर काहींचे या पिकांचे ढिग जमा झालेले आहेत. रात्री अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात पसरलेल्या कडपा आणि जमा झालेल्या ढिगांमध्ये पाणी शिरले असून ही पिके सडण्याच्या मार्गावर आहेत. जमा झालेल्या पिकांच्या ढिगांवर पॉलीथीन, ताडपत्री झाकून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. अकाली पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतल्यामुये शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे.मुसळधार पाऊसजवाहरनगर : जवाहरनगर परिसरात जोरदार पाऊस बरसला. या भागात लावण्यात आलेल्या रबी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. भंडारा जिल्ह्याच्या सीमेला नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका लागून आहे. या सीमेवर गारांचा पाऊस झाला. जवाहरनगर ते भंडारा या मार्गावर धो-धो पाऊस बरसला. मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना समोरचे वाहन दिसत नव्हते, अशी परिस्थिती होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहनांचा वेग कमी करावा लागला होता. (लोकमत चमू)
जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला
By admin | Updated: February 28, 2016 00:47 IST