मोहाडी : जिल्ह्यातील खाजगी शाळेतील ८५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. आयुक्त (शिक्षण) यांच्या आदेशानुसार व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या निर्देशानुसार मुख्याध्यापकांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले. यापैकी ६४ शिक्षकांना दुसऱ्या शाळेत रूजू करण्यात आले. मात्र २१ शिक्षकांना रूजू करण्यास मुख्याध्यापकांनी नकार दिला. शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना वारंवार पत्र देवूनही त्यांच्या पत्राला मुख्याध्यापकांनी केराची टोपली दाखविली.यासाठी ७ डिसेंबर रोजी श्री गणेश शाळा भंडारा येथे मुख्याध्यापक, संस्थासंचालक व अतिरिक्त शिक्षक यांची सभा आयोजित करण्यात आले होती. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी के.झेड़ शेंडे यांनी शासनाच्या निर्देशानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रूजू करून घेण्याचे निर्देश संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले. मुख्याध्यापकांची बाजू ऐकल्यानंतर काही शिक्षकांच्या आदेशात अदलाबदल करण्यात आले. यातून ६४ शिक्षकांना प्रश्न सुटला. मात्र २१ शिक्षकांना रूजू करून घेण्यास काही मुख्याध्यापकांनी नकार दिला. शिक्षकांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या एका शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या मुख्याध्यापकानी शिक्षकांना रूजू करून घेण्यास नकार दिल्याने, ही संघटना शिक्षकांच्या हिताची की संस्था संचालकांच्या हिताची असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. ह्या मुख्याध्यापकांसमोर माध्यमिक शिक्षणाधिकारी नतमस्तक झाल्याने सभा अर्ध्यावरच बंद करण्यात आली. यामुळे २१ अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न कायमच राहिला. सभेत काही मुख्याध्यापक अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून घेण्यास मुख्याध्यापक तयार असतांना एका प्रसिध्द शाळेचा संचालक मात्र त्यांना हाताने रूजू करू नका, असा इशारा करीत होते.
शिक्षक समायोजनाचा प्रश्न कायम
By admin | Updated: December 8, 2014 22:31 IST