भंडारा : बचत गटांच्या माध्यमातून काही प्रकल्प सुरू होतात. मात्र थोड्या कालावधीनंतर ते बंद पडतात. असे होऊ नये यासाठी उत्पादनाची गुणवत्ता चांगली असली तरच ते स्पर्धेत टिकतील. तुम्ही लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात परिवर्तन होण्यासाठी चांगले काम करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी यांनी केले.आंधळगाव येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ओमसाई महिला कोसावस्त्र उत्पादक गटाने कोसा कापड विणण्याच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी श्री द्विवेदी बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य डॉ. उल्हास बुराडे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, रेशीम विकास अधिकारी रायसिंग, माविमच्या जिल्हा समनव्यक ज्योती निभोंरकर उपस्थित होत्या.द्विवेदी म्हणाले, आंधळगावमध्ये सुतकताई आणि विणकाम एका छताखाली आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यावर्षी जिल्हा परिषदेकडून ४ हातमाग खरेदी करण्यासाठी निधी देणार आहे. यातून बचत गटातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळावे हा मुख्य उद्देश आहे. तुमच्यावर टाकलेला विश्वास तुम्ही सार्थ ठरवणार, अशी खात्री आहे.डॉ. उल्हास बुराडे म्हणाले, आंधळगाव ही विणकरांची भूमी आहे. पण विणकाम हा कोणत्याही एका विशिष्ट समाजाचा व्यवसाय होऊ शकत नाही. या व्यवसायात येवून आंधळगावला नवीन ओळख निर्माण करून द्यावी, असे त्यांनी आवाहन केले. ज्योती निंभोरकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता चांगली असावी
By admin | Updated: March 28, 2015 00:30 IST