विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : शाळांचा शिक्षण विभागाला ठेंगातुमसर : कडक शिस्त व नियम सांगणाऱ्या सीबीएसी पॅटर्नच्या शाळा रेकॉर्डतोड उष्णतेत भर दुपारी १२ ते १२.३० वाजता विद्यार्थ्यांना सुटी देत आहे. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी सकाळी १० वाजता शाळा सोडण्याचे आदेश निर्गमीत केले. परंतु अनेक शाळांनी या आदेशाला ठेंगा दाखविला आहे. भर दुपारी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.विदर्भाची उष्णता यावर्षी रेकॉर्डतोड आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्व शाया सकाळपाळीत सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उन्हाची तीव्रता बघता सर्व शाळा सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांना सुटी देण्यात यावी तर शिक्षकवृंदांना सकाळी ११ वाजता सुटी देण्याचे निर्देश भंडारा जिल्ह्यातील शाळांना देण्यात आले. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले.शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना तातडीने तशा सूचना केल्या. यात सीबीएससी शाळांचा सुद्धा समावेश आहे. परंतु काही सीबीएससी शाळा आजही दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान विद्यार्थ्यांना सुटी देत असल्याचे चित्र तुमसर तालुक्यासह भंडारा जिल्ह्यात दिसत आहे. यात जिल्ह्यातील नामवंत शाळांचा सुद्धा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
चिमुकल्या विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो झाडाचा आश्रय
By admin | Updated: April 27, 2016 00:27 IST