पालकांची मागणी : शाळा बंद आंदोलनाचा तिसरा दिवसकरडी (पालोरा) : जांभोरा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत वर्ग ६ ते ७ मध्ये ३ शिक्षकांचे पद रिक्त आहेत. शिक्षक नसल्याने गावकऱ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोहाडीचे गटशिक्षणाकिधारी रमेश गाढवे यांनी आंदोलक पालकांशी चर्चा करीत तात्पुरते तीन शिक्षक पुरविण्याचे आश्वासन दिले. मात्र कायम स्वरूपी शिक्षकांच्या मागणीवर गावकरी ठाम राहिल्याने तिसऱ्या दिवशीही शाळा बंद होती.जांभोरा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत वर्ग १ ते ७ असून शिक्षण विभागाला वर्ग ८ वा सुरू करण्याची परवानगी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती जांभोरा यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. परंतु गावातील खाजगी शाळांच्या दबावात प्रशासनाने परवानगी नाकारली. उलट खाजगी शाळेला वर्ग ५ ते ७ वी परवानगी याच प्रशासनाने व त्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा परिषद शाळा तोडण्यासाठी या अधिकारी वर्गाने खाजगी शाळा संचालकांशी संधाले साले असल्याचे दिसून येत आहे. मात्र गावकऱ्यांनी शाळा तोडण्याचे प्रशासनाचे मनसुबे उधळून लावत वर्ग ८ वा सुरू केला आहे. वर्ग १ ते ८ मध्ये सुमारे २२२ विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे.शाळा सुरू होण्याच्या दुसऱ्या दिवसांपासून जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक दिला जात नाही, तोपर्यंत शाळा बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा पावित्रा पालकांनी घेतला. गटशिक्षणाधिकारी रमेश गाढवे जांभोरा येथे आले. तात्पुरते शिक्षक देण्याचे त्यांनी मान्य केले. मात्र कायमस्वरूपी शिक्षकांची मागणी रेटून धरल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागले. शिक्षक ए.बी. गजभिये हृदयविकाराने त्रस्त असल्याने त्यांच्याकडून अध्यापनाचे कार्य होत नाही. स्वत: निवृत्ती घेण्याचा त्यांचा मानस आहे. वर्ग १ ते ५ मध्ये शिक्षकांची पदे भरलेली आहेत. मात्र ६ ते ८ साठी एकही शिक्षक नाही. मात्र ६ ते ८ साठी एकही शिक्षक नाही. अध्यापनाचे कार्य कसे करावे, असा प्रश्न आहे. ३ शिक्षकांची गरज आहे.(वार्ताहर)खाजगी शाळांच्या दबावात वर्ग ८ ची परवानगी नाकारून खाजगी शाळेला वर्ग ५ ते ७ वी परवानगी अन्यायकारकरित्या प्रशासनाने दिली. आरटी अॅक्टनुसार ८ वीला मान्यता देणे गरजेचे होते. तरीही गावाच्या संमतीने वर्ग सुरू करण्यात आला आहे. ३ शिक्षक जोपर्यंत कायमस्वरूपी दिले जात नाही, तोपर्यंत पालकांचे शाळाबंद आंदोलन सुरू ठेवले जाईल.-डी.झेड. सराटे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक जांभोरा.गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तात्पुरते शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. मात्र कायमस्वरूपी शिक्षकांविषयी बोलले नाही. तसे लेखी पत्र दिले नाही. शिक्षणाचा बाजार मांडल्या सारखी अवस्था आहे. शिक्षणाचे अच्छे दिन केव्हा येणार याची प्रतिक्षा सुरू आहे.-सत्यपाल बिसने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जांभोरा.
कायमस्वरूपी शिक्षक द्या
By admin | Updated: July 1, 2016 00:38 IST