भंडारा : तोट्यात चालणारा संघ नफ्यात आणून दूध उत्पादक शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधण्याच्या उद्देशातून भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक संघाने दि.२१ मे पासून दुधाला दरवाढ लागू केली आहे. राज्यात सर्वाधिक दरवाढ देणारे संघ म्हणून भंडारा संघ अव्वल ठरले आहे. दुग्ध उत्पादकांना सुगीचे दिवस आले असून गुणवत्तापूर्ण दुधाची खरेदी करण्यासाठी जिल्हा संघ तयार असून संघाला मिळणारा नफा दरवाढीच्या रुपात वाटला जाईल, निकट भविष्यात दुधाला आणखी अधिक दर दिले जातील, असा विश्वास संघाचे जिल्हाध्यक्ष विलास काटेखाये यांनी व्यक्त केला. बेभरवशाची शेती करणार्या भंडारा जिल्ह्यातील शेतकर्यांचा दुग्ध उत्पादन हा प्रमुख जोडधंदा असून जिल्ह्यात दररोज सुमारे दीड ते दोन लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. अनेक वर्षे तोट्यात चालणार्या दुग्ध उत्पादक संघाची धुरा विलास काटेखाये यांनी स्वीकारल्यापासून, संघ नफ्यात आला आहे. संघाने त्यांच्याकडील सर्व कर्जाची परतफेड करण्याबरोबरच दुग्ध उत्पादकांना अत्याधिक दर लागू केले. राज्यातील मोजक्या सहकारी दूध संघात समावेश असलेल्या भंडारा जिल्हा संघाने दरवाढ लागू केली असून गायीच्या दुधाला त्याच्यातील फॅटच्या प्रमाणानुसार २० रुपयांपासून ३० रुपये २० पैशांपर्यंत दर देऊ केले आहे. म्हशीच्या दुधाला अधिक भाव असून दुधातील एसएनएफ फॅटच्या प्रमाणानुसार, २९ रुपये ८० पैशापासून तब्बल ४६ रुपये ६० पैशापर्यंतचे दर लागू केले आहे. राज्यातील अन्य सहकारी दूध संघाकडून दुधाला दिले जाणारे तुलनात्मक दर तपासले असता भंडारा दुुग्ध उत्पादक संघाचे दर राज्यात सर्वाधिक आहे. दरम्यान भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाच्या वतीने दूध भुकटी प्रकल्पाची उभारणी केली जात असून याच वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यावेळी संघाला दररोज किमान २ लाख लिटर दूधाची गरज भासणार आहे. यापैकी १ लाख लिटर दुधाचे पावडरमध्ये रुपांतर केले जाईल. सद्यस्थितीत भंडारा जिल्हा दुग्ध संघातर्फे दररोज सुमारे ६० ते ६८ हजार लिटर दुधाचे संकलन केले जात असून त्यापैकी २० हजार लिटर किसान ब्रँडचे दूध अनेक जिल्ह्यातील खुल्या बाजारात विकण्यासोबतच कामठी आणि पुलगाव येथील सैनिक छावण्यांना पुरविले जाते. अमुलला ३० ते ४० हजार लिटर व महानंदाला ७ हजार लिटर दुधाचा पुरवठा संघातर्फे केला जातो. जवळपास ३ हजार लिटर दुधातून खोवा, पनीर, दही आणि अन्य उत्पादने तयार केली जातात. जिल्ह्यातील सर्व व्यापार्यांकडील गुणवत्तापूर्ण दुधाची खरेदी करण्यास संघ तयार असून दूध उत्पादक शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी कटीबद्ध असलेला संघ, मिळणारा नफा दरवाढीच्या रुपात वितरीत करणार आहे. दूध खरेदी करणार्या खासगी कंपन्याप्रमाणे जिल्हा संघ अनामत रक्कम घेण्यात येत नाही. संकलन करणार्या दुग्ध संस्थांना प्रति लिटरमागे १ रुपये या दराने कमीशन देण्यात येते. येत्या काही दिवसात पुन्हा दरवाढ देऊन शेतकर्यांचे हित जपण्याचा प्रयत्न संघाकडून केला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विलास काटेखाये यांनी दिली. संचालक मंडळाच्या प्रयत्नाने जिल्हा संघ दूध उत्पादकांच्या उत्थानासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
दूध संघाकडून दुग्ध उत्पादकांना दरवाढ
By admin | Updated: May 22, 2014 23:38 IST