निवडणूक अर्बन बँकेची : सहकार पॅनेलला मात देण्यासाठी गुर्जर पॅनेलची खेळीभंडारा : सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष - उपाध्यक्षपदाची निवडणूक बुधवारला दुपारी बँकेच्या सभागृहात पार पडली. यात अध्यक्षपदी महेश जैन यांची तर उपाध्यक्षपदी हिरालाल बांगडकर यांची अविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या अर्बन बँकेच्या १९ संचालक पदासाठी दि.५ जुलै रोजी निवडणूक पार पडली. यात सत्ताधारी सहकार पॅनेल, गुर्जर पॅनेल व जनहित पॅनेल रिंगणात होत्या. या निवडणुकीत तिन्ही पॅनेलचे एकूण ५३ उमेदवार रिंगणात होते. यात सहकार पॅनेलला १२, गुर्जर पॅनेलला ६ तर जनहित पॅनेलला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर बुधवारला अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक जिल्हा निबंधक अजय कडू यांच्या अध्यक्षतेत विशेष सभा बोलाविण्यात आली. होती. या सभेत सर्वच १९ संचालक उपस्थित होते. यात अध्यक्षपदासाठी महेश जैन व उपाध्यक्ष पदासाठी हिरालाल बांगडकर यांनीच नामांकन दाखल केले. त्यामुळे पीठासीन अधिकारी कडू यांनी त्यांना अविरोध निवडून आल्याचे घोषित केले. दलाल यांच्या नावावर असहमतीसत्ताधारी सहकार पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे धनंजय दलाल यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर होते. परंतु अंतर्गत गटबाजीमुळे दलाल यांना कोणत्याही स्थितीत अध्यक्ष बनू द्यायचे नाही, असे गुर्जर पॅनेलने ठरविले होते. त्यामुळे त्यांना पदापासून रोखण्यासाठी गुर्जर पॅनेलने जैन व बांगडकर यांच्या नावाला सहमती दर्शविली. त्यानंतर त्यांची अविरोध निवड झाली. अध्यक्षपद भंडारा जिल्ह्याला न मिळाल्यामुळे आता संचालकांमध्येच चर्चा रंगू लागलेल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)हा तर भंडारा जिल्ह्यावर अन्याय -वाघायेअर्बन बँक ही मूळ भंडारा जिल्ह्याची बँक आहे. असे असताना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राबाहेरच्या संचालकाला अध्यक्ष बनविण्याचा घेतलेला निर्णय हा भंडारा जिल्ह्यावर अन्याय करणारा आहे. याचे परिणाम काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला भविष्यात येणाऱ्या मोठ्या निवडणुकीमध्ये भोगावे लागणार आहेत. या बँकेवर धर्मनिरपेक्ष पक्षांचे वर्चस्व आहे. बँकेत बहुजन समाजाचे एकाहून अधिक संचालक आहेत. अशा स्थितीत दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांनी एकत्र येऊन हा निर्णय घेण्याची गरज होती. परंतु तसे न करता क्षेत्राबाहेरच्या व्यक्तीला अध्यक्ष बनवून खेळलेली खेळी ही सर्वांसाठीच धोकादायक असल्याची प्रतिक्रीया काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून व्यक्त केली.
अध्यक्षपदी जैन, उपाध्यक्ष बांगडकर
By admin | Updated: July 23, 2015 00:26 IST