लाखांदूर पंचायत समितीअंतर्गत तालुक्यात एकूण ६२ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गत मागील दीड वर्षापासून एकूण १११.५३ लाख रुपयांचे पथदिव्यांचे वीजबिल थकित असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत थकीत वीजबिल भरण्याचे निर्देश दिल्याने वीज वितरण कंपनीद्वारे कारवाई बंद केली होती. शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींसाठी गत दोन वर्षात ७.४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच संघटनेद्वारे लाखांदूर बिडिओअंतर्गत जिल्हा परिषद सीईओंना निवेदनातून शासनाच्या जिल्हा परिषदअंतर्गत थकीत वीज बिलाचा भरणा करण्याची मागणी करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या पथदिव्यांच्या वीज बिलाचा भरणा शासनाच्या जिल्हा परिषदेअंतर्गत केला जात होता. तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांद्वारे ग्रामपंचायत क्षेत्रात विविध विकास कामांकरिता उपलब्ध १५ व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत थकीत वीज बिलाचा भरणा करण्याला विरोध करण्यात आला.
बॉक्स
ग्रामीण भागात पावसाळ्याच्या दिवसात दुर्गंधीचे वातावरण दिसून येत आहे. रात्रीच्यादरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रात उपलब्ध पथदिव्यांच्या उजेडामुळे कीटकांपासून नागरिकांचा बचाव केला जातो. मात्र पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा भरणा न करण्यात आल्याने वीज कंपनीद्वारे पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने अंधारात ग्रामीण नागरिकांना वावरावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.