लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) (भंडारा) : राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बिनाखी गावातील कैलास गौतम यांचे कुटुंबीय मागील आठ दिवसांपासून दहशतीत आहेत. घरातील साहित्य रहस्यमयरीत्या फेकले जाणे, अचानक भांडी पडणे, बंद गॅस शेगडी सुरू होणे आदी प्रकारामुळे हे कुटुंब चांगलेच धास्तावले आहे.
कुटुंबीयांनी सांगीतले की, सुरुवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर हा प्रकार वाढला. साहित्य फेकताना कुणी दिसत नसले तरी जमिनीवर पडताच आवाज येतो. कैलासच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. तीन खोल्यांच्या या घरात तिन्ही भावंडांचे कुटुंबीय राहतात. यातील एका भावंडाचे कुटुंब हे तिरोडा शहरात वास्तव्यास आहे. तर दुसरे भाऊ संजय गौतम हे दुसऱ्या खोलीत वास्तव्यास आहे. तिसऱ्या खोलीत कैलास गौतमचे कुटुंब वास्तव्यास आहे. गेल्या आठ दिवसांपासून कैलासच्या खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त फेकले जात आहे. सकाळी सुरू होणारा हा प्रकार रात्री १० वाजेपर्यंत सुरू असतो. कपाटाचे काच रहस्यमयरीत्या फोडले जातात. अचानक ग्लास अथवा भांडी पडण्याचा आवाज येतो, परंतु ते पडताना दिसत नाही. गॅस बंद केल्यानंतर अचानक सुरू होतो. भीतीपोटी स्वयंपाकानंतर रेग्युलेटर बाहेर काढून ठेवले जाते. मुलाचे बसचे पास रहस्यमयरीत्या जळाले.
प्रकार गौतमच्याच खोलीतशेजारी असणारे भावाचे घर सुरक्षित आहे. फक्त कैलास गौतमच्या खोलीत हा प्रकार सुरू आहे. यामुळे या रहस्यमय प्रकाराचा उलगडा करणे महत्त्वाचे झाले आहे. या रहस्यमय प्रकारावर कुणाचाही विश्वास नाही. साहित्य अस्ताव्यस्त होत असल्याचा अनुभव आपल्याला आल्याचे येथील उपसरपंच राजेंद्र बघेले यांनी म्हटले आहे.