राजेश काशिवार यांनी घेतली बैठक : अधिकाऱ्यांना धरले धारेवरलाखांदूर : सर्वसामान्यांनी शासनाच्या अनेक महत्वाच्या योजनांचा लाभ जीवनमान उंचावण्यासाठी मोलाच्या ठरतात. पंरतू प्रशासनाकडून केवळ आलेल्या योजना वाटप करणे. यापलिकडे अधिकारी खरचं त्या लाभार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावला की नाही हे तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. त्यामुळे योजनांची माहिती नको, ‘आय वॉन्ट रिझल्टस्’ असे म्हणत आमदार बाळा काशिवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात आज आमदार काशिवार यांच्या उपस्थितीत सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार विजय पवार, खंडविकास अधिकारी देवीदास देवरे, जि.प. सदस्य रमेश डोंगरे, उपसभापती मंगला बगमारे, न.प. उपाध्यक्ष नरेश खरकाटे, न.प. सदस्य विनोद ठाकरे, न.प. सदस्य प्रल्हाद देशमुख, जि.प. सदस्या माधुरी हुकरे, प्रदीप बुराडे, शुुध्दमता नंदागवळी, भाजपा तालुका अध्यक्ष नूतन कांबळे, माजी जि.प. सदस्य वामन बेदरे, नायब तहसीलदार कांबळे, योगेश ब्राह्मणकर, पं.स. सदस्य नेहा बगमारे, अल्का मेश्राम, पुंडलिक पेलणे आदी उपस्थित होते. आढावा वाचून दाखविल्यानंतर प्रत्येक विभागाचा कामासंदर्भात तसेच योजनांची माहिती जाणून घेतली असता, योजना वाटपातील घोळ व योजना या सर्वसामान्यापर्यंत पोहोचतात का? योजनेमुळे लाभार्थ्यांचा आर्थिक स्तर उंचावला का? ही सत्य बाब जेव्हा आढावा बैठकीत उघड झाली. अनेक ग्रामपंचायत सरपंचांनी पितळ उघडे करीत, अधिकारी योजना वाटपात सरपंचांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला. आरोग्य विभाग संदर्भात आमदार काशिवार चांगलेच गंभीर दिसले. कृषी, वनविभाग, व अन्य योजनेसंदर्भात चर्चा करुन रोहयोची कामे सुरु करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या. (तालुका प्रतिनिधी)
आढावा बैठकीत योजनांचे पितळ उघड
By admin | Updated: March 7, 2016 00:18 IST