जांब (लोहारा) : तुमसर तालुक्यात येत असलेल्या लोहारा, सोरणा, गायमुख, सोनपुरी, लंजेरा, पिटेसूर, गोवारीटोला परिसरात दिवसातून तेरा तासाचा भारनियमन करित असल्याने या परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली असून या परिसरातील जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. सध्या जड धानाला पाण्याची गरज आहे. ज्यांच्याकडे पंप आहे तो शेतकरी पंपाच्या माध्यमातून पाणी धाना देवून धान पिक कशाबशा वाचविण्याचा प्रयत्नात आहे. या परिसरातील धानपिक किडीनी ग्रासले आहे. धानपिक पाण्याअभावी करपले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची साधन आहे तेच धानपिक आज आपल्याला दिसत आहे. त्यामध्येही लाईट त्याला सात देत नाही. दिवसभरातून फक्त शेतकऱ्यांना सात तास लाईट दिला जात आहे. बाकीची वेळी भारनियमन केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले धानपिक पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहेत. तसेच गावलाईन सुद्धा दिवसातून १३ तास भारनियमन होत असल्याने लोहारा, गायमुख, सोरणा, सोनपुरी, लंजेरा, पिटेसूर या परिसरातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून लोहारा लंजेरा, सोरणा, पिटेसूर परिसरातील भारनियमन बंद करण्याची मागणी सरपंच गुरूदेव भोंडे, सरपंच ग्यानिराम शेंडे, सरपंच शामराव ठाकरे केली आहे. (वार्ताहर)
१३ तासांच्या भारनियमनाने जनता त्रस्त
By admin | Updated: November 6, 2014 22:50 IST