प्रकरण मारहाणीचे : जिल्हाभरात उमटले पडसादपवनी : भुयार येथे ग्रामविस्तार अधिकारी व महिला सरपंच यांना बेदम मारहाण प्रकरणी भंडारा जिल्हा ग्रामसेवक संघाद्वारे लेखणी बंद व धरणे आंदोलन सुरूच असून आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. या मारहाणी प्रकरणी २० महिलांना अटक करून त्यांची जमानतीवर सुटका करण्यात आली आहे. ग्रामसेवकांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पवनी पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून लेखनीबंद आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद संपुर्ण जिल्ह्यात उमटले आहे. त्यामुळे या प्रकरणावर तोडगा काढण्याची गरज आहे.या मारहाण प्रकरणी ग्रामसेवक संघटनेने मागील तीन दिवसापासून लेखनी बंद आंदोलन करून धरण्यावर पंचायत समिती कार्यालयासमोर बसले आहेत. संघटनेच्या मागणीनुसार २० महिलांना अटक करण्यात येवून त्यांची जमानतीवर सुटका केली आहे. भंडारा जिल्हा ग्रामसेवक संघातर्फे जिल्हा अध्यक्ष एस.ए. नागदेवे, कार्याध्यक्ष मनोज राजाभोज, तालुका अध्यक्ष संदीप भिवगडे, सचिव एस.एस. खोब्रागडे, तालुका संघटक डी.एच. भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कक्ष अधिकारी पं.स. पवनी डी.के. इस्कापे यांच्या मार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. भंडारा यांनी मागण्यांचे निवेदन दिले. या मागणीनुसार भुयार येथील ग्राम विस्तार अधिकारी एस.वी. भटकर यांचा पदभार काढून तो पदभार संध्या पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. पण संघटनेची मागणी भटकर यांची बदली ईतरत्र करण्याची आहे. जोपर्यंत बदली होणार नाही तोपर्यंत बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा संघटनेचा निर्धार आहे. या ग्रामसेवकांच्या आंदोलनाला पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून व लेखणी बंद आंदोलन करून समर्थन दिले आहे. ग्रामविस्तार अधिकारी व महिला सरपंचावर लावलेल्या अॅट्रासिटीचा गुन्हा रद्द करण्याचीही संघटनेची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
पवनीत ग्रामसेवकांचे तिसऱ्या दिवशीही लेखणी बंद आंदोलन
By admin | Updated: February 20, 2016 01:12 IST