उसर्रा : उसर्रा येथील आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे.येथे बऱ्याच दिवसापासून आयुर्वेदिक रुग्णालय आहे. येथील वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाल्यापासून शासनाने एका कंत्राटी डॉक्टरची नियुक्ती केली. अकरा महिने हे कंत्राटी डॉक्टराने काम पाहिले. अकरा महिने झाल्यानंतर डॉक्टरांचे कंत्राट संपले. आता ३ ते ४ महिने लोटूनही डॉक्टरचा थांगपत्ता नाही. शासनाने अद्यापही कुठलीच नियुक्ती केली नाही.उसर्रा परिसरात उसर्रा, सालई (बुज.) आदी गावे येतात. पण डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात एम.पी.डब्लू. ची जागा रिक्त आहे. गेल्या तेरा वर्षापासून या पदावर कार्यरत अधिकाऱ्याचे स्थानांतरण झाल्याने रुग्णालयात एम.पी.डब्लू.ची जागा रिकामी आहे. सध्या पावसाळ्यात परिसरात हिवताप, कॉलरा, विषमज्वर आदी साथीचे रोग वाढले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र डॉक्टरांअभावी रुग्णांची हेळसांड होत असून लोकप्रतिनिधी व शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)
रुग्णालयात रुग्णांची हेळसांड
By admin | Updated: August 13, 2014 23:39 IST