भंडारा : पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात गुरुवारी रात्री अपघातात जखमी झालेल्या युवकाला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असतानाही त्याची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तर पोलीस चौकीत त्याला नागपुरला रेफर केल्याची नोंद घेण्यात आली. रुग्णालय प्रशासनाकडून योग्य माहिती न मिळाल्याने नातेवाईकांची हेडसांड झाल्याचे चित्र आज बघायला मिळाले.पवनी तालुक्यातील रामेश्वर पांडूरंग जिभकाटे या युवकाचा आज आसगाव जवळ रात्री अपघात झाला. यात तो गंभीर अवस्थेत असताना त्याला परिसरातील नागरिकांनी प्रथम पवनी ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना रात्री उशीरा मिळाली. याप्रकरणी सदर प्रतिनिधीने जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाची माहिती घेतली असता बाहय रुग्ण विभागातील रजिस्टरमध्ये सदर जखमी युवक वॉर्ड नं. १४ मध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली. दुसऱ्या माळ्यावरील वॉर्ड नं. १४ मध्ये माहिती घेतली असता असा रुग्ण दाखलच नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील पोलीस चौकीतून माहिती घेतली असता. सदर रुग्णाला नागपूर येथील वैद्यकिय महाविद्यालयात डॉक्टरच्या सांगण्यावरुन रेफर केल्याची नोंद करण्यात आली व त्यानुसार रुग्णाला नागपूरला नेल्याचे सांगितले. यामुळे नातेवाईकांनी नागपूरला जाण्याची तयारी चालविली असतानाच सदर रुग्णावर सामान्य रुग्णालयातच उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली. एकंदरीत सामान्य रुग्णालय प्रशासनाची कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने येथील कर्मचारीही रुग्ण किंवा त्याचे नातेवाईकांना हिनतेची वागणूक देतात. याचाच हा प्रत्यय मनावा.सामान्य रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्या रुग्णाला नागपूरला रेफर केल्याची नोंद चौकीतील पोलिसांनी कशी घेतली हा संशोधनाचा विषय असला तरी यामुळे नातेवाईकांची व रुग्णाची येथे नेहमीच हेडसांड होते ही बाब समोर आली. (शहर प्रतिनिधी)रुग्ण गंभीर जखमी असल्यास त्याला नागपूरला रेफर करण्यात येते. त्यानुसार त्याची रेफरची चिठ्ठी बनवून पोलिस चौकीत तशी नोंद केली असावी. त्याला रेफर केले असल्यास सामान्य रुग्णालयात उपचार करता येणार नाही. याप्रकरणात माहिती नसल्याने अधिक सांगू शकत नाही. - सुनीता बडे, निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा
रुग्ण भंडाऱ्यात; नोंद नागपूर रेफरची
By admin | Updated: March 28, 2015 00:26 IST