तुमसर : रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा देण्याचा दावा करणाऱ्या शेकडो रेल्वे प्रवाशांना प्रचंड गर्दीमूळे रेल्वे डब्यात प्रवेशच करता येत नाही. दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेगाड्या हाऊसफुल्लमुळे एस.टी तथा खाजगी वाहनांनी सध्या प्रवास करावा लागत आहे. बुधवार व गुरूवारी असे चित्र तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले.दिवाळी हा मोठा व महत्वाचा सण असल्याने मजुरी करणारे, व्यापारी, नोकरी करणारे दिवाळीनिमित्त हमखास गावाकडे जातात. रेल्वेचे भाडे कमी असल्याने सामान्य प्रवाशांचा कल रेल्वेने प्रवास करण्याचा असतो. दिवाळीनिमित्त विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशानाने घेतला, परंतु नागपूर ते रायपूर दरम्यान दिवाळी निमित्त विशेष ट्रेन सोडण्यात आली नाही हे विशेष.मंगळवार, बुधवार व गुरूवारी तुमसररोड ते तिरोडी दरम्यान धावणारी टी.टी. ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. सकाळी १०.३० दरम्यान तिरोडीकडे जाणारी या रेल्वेगाडीला एक पूर्ण व दोन अर्धे डब्बेच जोडले होते. नागपूर व गोंदिया कडून दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या होती. या प्रवाशांकडे प्रवाशाची तिकिटे होती, परंतु गर्दीमुळे प्रवाशांना रेल्वे डब्ब्यात प्रवेशच करता आला नाही. नाईलाजाने त्या प्रवाशांनी एसटी व खाजगी वाहनाकडे धाव घेतली. वृद्धांना व लहान मुलांना या गर्दीचा मोठा फटका बसला. सामानासहीत या प्रवाशांना एसटी स्थानक व खाजगी वाहनापर्यंत पायपीट करावी लागली.तुमसर रोड जंक्शन येथे रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी हे सारे दृश्य बघत होते. केवळ ८१ कि़मी. अंतरावर रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांचे कार्यालय आहे. मागील अनेक वर्षापासून असाच त्रासाचा प्रवास या परिसरातील रेल्वे प्रवाशांना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रवासी रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल
By admin | Updated: October 26, 2014 22:35 IST