सजविलेल्या आॅटोतून नवागतांचे आगमन : खीर वाटून केले विद्यार्थ्यांचे तोंड गोडलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे सत्कार करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहे. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. नवीन शाळा, शिक्षक, परिसर पाहून विद्यार्थी घाबरू नये, शाळा हवीहवीशी वाटावी हा उद्देश समोर ठेवून शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला.सुमारे दीड महिन्यानंतर मंगळवारी शाळा सुरु झाल्या. अनेक शाळांनी नवागतांचे स्वागत विविध प्रकारे केले. जनता विद्यालयाने नवागत विद्यार्थ्यांना आॅटोमधून शाळेत आणले. शाळेच्या प्रवेशद्वारावर त्यांची ओवाळणी महिला शिक्षकांनी केली. नवागतांच्या हातात गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही या आदरातिथ्याने भारावून गेले. आॅटोला सजविण्यात आले होते हे विशेष. शाळेचा परिसर सुंदर, सुशोभीत करण्यात आला होता. नवागतांसोबत सर्व विद्यार्थ्यांना खीर वाटप करण्यात आले. नवागतांना पहिल्याच दिवशी पुस्तक वितरीत करण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागातर्फे सायकल वितरीत करण्यात आले. यावेळी प्राचार्य हेमंत केळवदे, उपप्राचार्य विजया मस्के, पर्यवेक्षक एस.एन. लंजे, पंकज बोरकर, मते, बिसेन, जवाहर दमाहे, सुधीर हिंगे, राजू गभणे, एम.वासनिक, भेलकर, मंदा गाढवे, खोब्रागडे, आरामे, गणेश चाचिरे, नितीन पाटील यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शिक्षण विभागाने राबविलेल्या या अभिनव उपक्रमाने पालकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सोबतच विद्यार्थ्यांमध्ये या स्वागताने शाळेतून आवड निर्माण झाली आहे. या अभिनव उपक्रमाचे तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
नवागतांच्या स्वागताने पालकही भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:36 IST