पत्रपरिषद : संजय तायडे यांचा इशाराभंडारा : आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाचा आजपर्यंताचा थकित शुल्क परतावा ३१ मार्चपर्यंत देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रातील एकही शाळा मोफत प्रवेश देणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा) चे प्रदेशाध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.ते म्हणाले, मराठी, इंग्रजी शाळा, संस्थाचालक संघटना राज्यभर पसरलेली आहे. दोन वर्षांपासून संघटना सभासदांची मोठी संघटना नावारूपाला आली आहे. गतवर्षी थकित फी परतावा मिळावा म्हणून संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदने देण्यात आली. त्यानंतर राज्यभर आरटीईच्या मोफत प्रवेशावर बंदी घालण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २७ एप्रिल २०१५ रोजी मंत्रालयात संघटनेला चर्चेसाठी बोलाविले. या चर्चेमध्ये बऱ्याच दिवसांपासून 'डबल एन्ट्री पॉर्इंट'चा घोळ निर्माण झाला होता. ज्याच्यामुळे संस्था चालकावर अन्याय होत होता. त्यावर मंत्र्यांनी तोडगा काढत इयत्ता १ ली पासून एकाच आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशाचा एन्ट्री पॉर्इंट असावा, असा शासन निर्णय काढला.महिन्याभराच्या आत मागील थकित चार वर्षाच्या प्रवेशाचा शुल्क परतावा देण्याचे आश्वासन मिळाले होते. त्याप्रमाणे किमान दोन वर्षाचा शुल्क परतावा राज्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मिळाला. ही परतावा मिळण्यास उशीर झाला म्हणून राज्य शिक्षण आयुक्तालय कार्यालयावर ७ आॅगस्ट २०१५ रोजी संस्था चालकांनी धडक मोर्चा काढून मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. अजुनही अनेक मागण्या शासन दरबारी पडून आहेत. त्या पुर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळात संघटना आग्रही भूमिका घेवून लोकशाही मार्गाने रस्ता रोको आंदोलन करणार आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने हाती घेवून सरकारला संस्था चालकांना भेडसावणारे ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडेल. त्यामुळे कुणी कितीही म्हणत असेल मेस्टा संघटनेत फुट पडली तर हे म्हणणे अती घाईचे ठरेल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची एक शाळा दत्तक घेवून यामध्ये त्या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता भौतिक सुविधा सुधारण्यापासून ते आयएसओ मानांकन मिळवून देण्यापर्यंत मेस्टाचे योगदान राहील, अशी माहिती संजयराव तायडे पाटील यांनी दिली. पत्रपरिषदेला डॉ. गजानन नारे, अनिल आसलकर, मनिष हांडे, अभिजित देशमुख, महेंद्र वैद्य, नेहा खैरे, नरेंद्र निमकर, किशोर पेठकर, रामचंद्र तरोणे, डॉ. नरेश पारधी, एस.एन. भांडारकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी )
अन्यथा एकही शाळा मोफत प्रवेश देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:33 IST