रंजित चिंचखेडे सिहोरायेथील कला महाविद्यालयात सुरू असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हे परीक्षा केंद्र रद्द करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.मागील काही वर्षापासून सिहोरा येथील कला महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे परीक्षा केंद्र देण्यात येत आहे. या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. यावर्षी या परीक्षा केंद्रावर २०९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात नोकरदारवर्ग तथा अन्य सेवेत कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक परीक्षेच्या नावावर निधी संकलित करण्यात आली. या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्यासाठी मुभा देण्यासाठी या निधीची वसुली करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मागील वर्षात प्रत्येकी दीड हजार रूपये वसूल करण्यात आले होते. विद्यार्थ्याकडून वसूल करण्यात आलेल्या निधीचा आकडा यावर्षी २ लाख ९ हजार रूपये इतका आहे. तीन खोल्यात हे विद्यार्थी परीक्षा देत असून एका टेबलवर दोन विद्यार्थ्यांना बसण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी ३ ते ५ हजार रूपये दिले आहेत अशा विद्यार्थ्यांची सोय महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या खोलीत करण्यात आली आहे. या खोलीत केवळ १० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या महाविद्यालयातील अनेक खोल्या रिकाम्या असताना ग्रंथालयांच्या खोलीत विद्यार्थ्यांना विशेष बैठकीची व्यवस्था करण्यात आल्यामुळे अन्य विद्यार्थ्यात संताप व्यक्त होत आहे.परीक्षा कालावधीत बाहेरुन कुणी येऊ नये, याकरीता मुख्य दरवाजाला कुलूप लावण्यात आले आहे. पोलिसांचा पहारा नसल्यामुळे काही तरूण शिक्षकांची भूमिका बजावत आहेत. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तथा परीक्षा शुल्कांच्या घोटाळ्यामुळे पाच वर्षापूर्वी हे महाविद्यालय चर्चेला आले होते. महाविद्यालय व्यवस्थापन विरोधात रास्ता रोको आंदोलन झाले होते.प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क म्हणून प्रत्येकी विद्यार्थ्यांकडून एक हजार रूपये घेतले आहे. महाविद्यालयात जागेचा अभाव असल्याने ग्रंथालयाच्या खोलीत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली असून अन्य कोणतीही वसूली करण्यात आलेली नाही. नागरिकांनी केलेले आरोप हे निरर्थक असून आधारहीन आहेत. - पी.डी. गभणे, परीक्षा समन्वयक, कला महाविद्यालय सिहोरा.
मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत सर्रास कॉपी
By admin | Updated: May 14, 2015 00:26 IST