साकोली : तालुक्यात काल रात्री साकोली व किन्ही एकोडी येथे दोन अपघात झाले. यात एक जण ठार तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली असून एकावर भंडारा व दुसऱ्या जखमीवर साकोली येथे उपचार सुरू आहे. पिपलायन काशीराम गिऱ्हेपुंजे (४०) रा. किन्ही असे मृताचे नाव आहे.काल रात्री पिपलायन गिऱ्हेपुंजे, हे मोटारसायकल क्रमांक एमएच-३६-ए-५५१ ने हंसराज पेटकुले (३५) रा. किन्ही यांचे सोबत एकोडी वरून किन्हीकडे निघाले असता एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला जोरदार धडक दिली. यात पिपलायन गिऱ्हेपुंजे हे जागीच ठार झाले तर हंसराज पेटकुले हे गंभीर जखमी झाले. त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले आहे. दुसरा अपघात साकोली येथे स्टेट बँकेच्या समोर घडला. यात बाजीराव भलावी हा रस्ता ओलांडीत असताना एका मोटारसायकलने धडक दिली. यात भलावी हा जखमी झाला. त्याचेवर उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)'त्या' अपघातातील जखमी युवकाचा मृत्यूलाखनी : ट्रेलरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय युवकाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी, पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. रंजीत इसन बोरकर रा.खुटसावरी, असे मृत युवकाचे नाव आहे. अपघातात खुटसावरी येथील दोघांचा मृत्यू झाल्याने गावात निरव शांतता पसरली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील गडेगाव येथे शुक्रवारी ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने नादिरा अशोक दिनकर (५०) रा. खुटसावरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुचाकी चालक अमित वाघमारे (२७) रा. वरठी व रंजीत इसन बोरकर रा. खुटसावरी हे जखमी झाले. जखमींवर लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र रंजीत बोरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र शनिवारी, पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर दुपारी खुटसावरी येथील स्मशानभूमित त्यांच्या पार्थिववर अंत्यसंस्कार करण्यात आले. रंजीत हा आई- वडीलाला एकुलता मुलगा होता. कमावत्या मुलावर काळाने घाला घातल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यांच्या मागे आई, वडील, दोन बहिणी असा आप्त परीवार आहे. (तालुका प्रतिनिधी)
दुचाकी अपघातात एक ठार, दोन जखमी
By admin | Updated: March 15, 2015 00:49 IST