महामार्गावरील घटना : जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार भंडारा साकोली : राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. महेश तेजराम मुंगमोेडे (३०) रा. उमरी असे मृतकाचे नाव असून नरेश कापगते (३२) रा. उमरी (ता.साकोली) असे जखमीचे नाव आहे. मुंगमोडे अति गंभीर असल्याने त्याला नागपुरला ‘रेफर’ करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालविली. ही घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील मौदा गावाजवळ घडली. वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर दोन्ही तरूण रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडले होते. मात्र कुणीही रूग्णालयात नेण्याचे सौजन्य दाखविले नाही. याचवेळी माजी आमदार सेवक वाघाये यांनी तिथून जात असताना त्यांना ही बाब कळली. त्यांनी स्व:तच्या वाहनातून दोन्ही गंभीर रूग्णांना जिल्हा सामाण्य रूग्णालयात दाखल केले. दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र मुंगमोडे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने रूग्णवाहिकेने नागपुरला हलविण्यात आले होते. मात्र नागपुरला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुठल्या वाहनामुळे अपघात घडला, वाहन कोणत्या दिशेने गेले, याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. महेश मुंगमोडे हा मौदा येथे स्थित साखर कारखान्यात कार्यरत असल्याची माहिती आहे. महेश व नरेश हे दोघही दुचाकीने जात असताना हा अपघात घडला. जखमी असलेल्या नरेश कापगते याच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद जिल्हा रूग्णालयात स्थित पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांनी केली. महामार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. (प्रतिनिधी / तालुका प्रतिनिधी)माणुसकी हरविलीअपघातानंतर दोन्ही तरूण वेदनेने रस्त्यावर विव्हळत असताना कुणीही त्यांना रूग्णालयात दाखल करण्याचे सौजन्य दाखविले नाही. माणुसकी हरवित चालल्याचे हे उदाहरणच समजावे. माजी आमदार सेवक वाघाये यांनी दखल घेतल्याने किमान एका युवकाचा प्राण वाचविण्यात यश मिळाले. अपघातानंतर मदतीचा हात दिला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रीया सेवक वाघाये यांनी दिली.
अपघातात एक ठार, एक गंभीर
By admin | Updated: August 9, 2016 00:30 IST