लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, गत दहा दिवसांत तब्बल दीड हजार पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ८६५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सरासरी दीडशे रुग्ण दररोज आढळत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. गुरुवारी २४४ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १४६४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या अत्यल्प होती. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू रुग्णसंख्या वाढायला लागली. विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरी दररोज शंभर ते १५० रुग्णांची भर पडत आहे. गत १५ मार्चपासून शंभरच्या वर रुग्ण आढळून येत आहे. १५ मार्चरोजी ८२, १६ मार्च ७२, १७ मार्च १४९, १८ मार्च ९९, १९ मार्च १०७, २० मार्च १३२, २१ मार्च १२३, २२ मार्च ११२, २३ मार्च १९८, २४ मार्च २१९ आणि २५ मार्च रोजी २१४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची एकूण संख्या १५३७ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ८६५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यात भंडारा ६८०२, मोहाडी ११९०, तुमसर २०२६, पवनी १६४५, लाखनी १६८०, साकोली १८३७, लाखांदूर ६८५ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी २२६१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ११७, मोहाडी ११०, तुमसर २९, पवनी ५८, लाखनी २१, साकोली ०८ आणि लाखांदूर तालुक्यात एक असे २४४ रुग्ण आढळून आले. गुरुवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ३३२ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या असून, भंडारातील बाजारपेठेतील वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केली आहे. मात्र त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गत दहा दिवसांत ७०६ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णातही सर्वाधिक ६८०२ रुग्ण भंडारा तालुक्यातीलच आहे, तर ॲक्टिव्ह रुग्णही भंडारा तालुक्यातच अधिक असून, या रुग्णांची संख्या ६६१ आहे. शहरात कोरोना नियमांचे पालन करताना नागरिक टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी गर्दी होत आहे. अनेक जण मास्क लावत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन गरजेचे झाले आहे.