वरठी : भंडारा-वरठी रस्त्यावर स्थित सॉ मिलमध्ये कार्यरत एका चौकीदाराचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. विठ्ठल शेंडे (७२) असे मृतकाचे नाव असून ते मुळ रहिवासी तुमसर येथील होत. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.भंडारा-वरठी रस्त्यावर सिरसी शिवारात आशापुरा सॉ मिल आहे. विठ्ठल शेंडे हे दीड वर्षांपूर्वी येथे चौकीदार म्हणून कार्यरत झाले होते. सॉ मिल आवारात असलेल्या खोलीत त्यांचे वास्तव्य होते. रात्रपाळीत चौकीदार म्हणून तो कार्यरत असायचे. नित्यनियमाप्रमाणे शेंडे हे सॉ मिलमध्ये आहे. रात्र झाल्याने ते पलंगावर झोपी गेले. यादरम्यान अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड व लाकडी पाटीने जोरदार प्रहार केले. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. विठ्ठल शेंडे हे तुमसर येथील रहिवासी होते. त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्यांना अपत्य नव्हते. यामुळे ते काही दिवसापूर्वी वरठी येथील हनुमान वॉर्डात राहायला आले होते. दीड वर्षापासून ते आशापुरा सॉ मिल मध्ये चौकीदार म्हणून कार्यरत होते. मिल मधील एका खोलीत त्यांचे वास्तव्य होते. सॉ मिलची रखवाली करून सकाळ संध्याकाळ फाटक खोलण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. नियमितपणे सकाळी ८ वाजता सॉ मिलचे मालक कारखान्यात आले. गेट बंद असल्यामुळे त्यांनी चौकीदाराला आवाज दिला. पण प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी आत प्रवेश केला. त्यावेळी विठ्ठल मृतावस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात आढळले. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून तपास भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, उपनिरीक्षक विजय चव्हाण व सहाय्यक पोलीस निरीक्षक तिकाराम गभने करीत आहेत. (वार्ताहर)
वरठीत वृद्धाचा निर्घृण खून
By admin | Updated: October 27, 2015 00:36 IST