तिसरा दिवशीही कारवाई : ५१ जणांचे अतिक्रमण हटविलेभंडारा : शहरातील मुख्य बाजारातील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. बाजारातील व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याचे काम पालिका प्रशासन करीत आहे. आज तिसऱ्या दिवशी पालिकेने अतिक्रमण हटविण्याची मोहिम राबविली. मात्र, या मोहिमेला पालिका पदाधिकारी, पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य मिळत नसल्याने कर्मचारी जीवाच्या भितीने धास्तावले असून मोहिम थंडावल्याचे दिसून येत आहे.शनिवारपासून पालिकेने शहरातील मुख्य बाजारातील अतिक्रमण हटविण्याची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. मुख्य बाजारातून बसस्थानकाकडे गेलेला रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या मार्गावर व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचे आहे. मात्र, त्यांनी हे अतिक्रमण काढले नाही. यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. पालिकेने हे अतिक्रमण हटविण्यासाठी बांधकाम विभागाला पत्र दिले. परंतु, त्यांच्याकडून याची दखल घेण्यात आली नाही. मंगळवारला मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी पोलीस विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याविना ५१ दुकानदारांचे अतिक्रमण हटविण्यात आले. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी किंवा पालिकेचे पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले नसल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेत सहभागी कर्मचारीही जीवाच्या भितीने कार्यवाही करण्यास धजावत आहे.मंगळवारला आनंद मिश्रा यांच्या नेतृत्वात पवन मोगरे, मुनिष मोगरे व सतिश आठले यांच्या व्यतिरिक्त एकही मोठा अधिकारी मोहिमेत दिसून आला नाही. या कर्मचाऱ्यांनीच पोस्ट आॅफिसपर्यंत मोहिम राबविली. यावेळी या कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून काही प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. पोलिसांचा पाहिजे तेवढा बंदोबस्त नसल्याने हे पालिकेचे कर्मचारीही काही प्रमाणात धास्तावलेले दिसले. या कार्यवाहीला पोलीस, सार्वजनिक बांधकाम व पालिका प्रशासनाचेही सहकार्य मिळाल्यास शहरातील संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात सहकार्य होईल. ( शहर प्रतिनिधी)
मोहिमेला अधिकाऱ्यांचे असहकार्य!
By admin | Updated: January 20, 2015 22:34 IST