भंडारा : आई स्टाफ नर्स होती. आयुष्यभर आरोग्य सेवा करून निवृत्त झाली. आता तिला कोरोनाचा संसर्ग झाला. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णसंख्येच्या तुलनेत सुविधांचा अभाव आहे, हे मान्य. पण, काल दुपारी ४ वाजता ऑक्सिजनसाठी नंबर लावला अन् सिलिंडर आज सकाळी मिळाला. सांगा, अशाने रुग्ण कसे बरे होतील, असा उद्विग्न सवाल जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या मुलाने केला.
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल्ल झाली असून, ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनसाठी मारामार सुरु आहे. अशातच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मिलिंद (नाव बदललेले) गेल्या आठ दिवसात जिल्हा रुग्णालयात आलेल्या अनुभवांचा पाढा वाचत होते. त्यांची आई ७७ वर्षांची आहे. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातून स्टाफ नर्स म्हणून सेवानिवृत्त झाल्या. बीपी आणि शुगरचा त्रास आहे. अशातच त्यांना कोरोनाची बाधा झाली. मुलाने तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सर्वप्रथम त्यांना डायलेसीस लगतच्या वाॅर्डात ठेवण्यात आले. नियमित औषधे मिळत होती. परंतु ऑक्सिजनसाठी विनवणीच करावी लागत होती. बुधवारी दुपारी ४ वाजता मिलिंदने आपल्या आईच्या ऑक्सिजनसाठी जिल्हा रुग्णालयात नंबर लावला. रात्री उशिरापर्यंत प्रतीक्षा करुनही सिलिंडर मिळाला नाही. गुरुवारी सकाळी सिलिंडर मिळाला. तोही अर्धाच. यानंतर त्यांच्या आईला वाॅर्ड क्रमांक १५मध्ये शिफ्ट करण्यात आले. सकाळी डाॅक्टर आणि परिचारिका राऊंड घेऊन गेले. सकाळी ऑक्सिजन मोजले असता ८६ भरले. मात्र, काही वेळाने मिलिंदने आपल्या जवळील ऑक्सिमीटरने ऑक्सिजन मोजले तेव्हा ३५ आले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तेथील डाॅक्टर आणि परिचारिकांना सांगितले. माझ्या आईने आयुष्यभर रुग्णांची सेवा केली. तिच्यावर तत्काळ उपचार करा. ऑक्सिजनची लेव्हल नेमकी किती आहे, हे सांगा, असे विनवणी करीत होते. सर्वजण एकून घेत होते. परंतु हतबल झाल्यासारखे कुणी पुढे येत नव्हते. अशी एकट्या मिलिंदची कहाणी नाही तर असे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात विपरीत परिस्थितीत उपचार घेत आहेत.
बाॅक्स
पंखे आणले घरुन
वाॅर्ड क्रमांक १५मध्ये कुलरची सुविधा नाही. उन्हाळा तापत आहे. अधिक पॉवरच्या गोळ्या घेऊन आधीच रुग्णांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यातच साधे पंखे, तेही दूर अंतरावर. यामुळे तेथे असलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या घरातून पंखे आणून सुविधा निर्माण केली. या वाॅर्डात साधे कुलर तरी लावा, अशी मागणी मिलिंद करीत होता.