भंडारा : केंद्र व राज्य स्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान मिशन असे नामकरण करण्यात आले असून फक्त स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमातूनच वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी १२ हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय ७ नोव्हेंबर २०१४ ला निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार शानाने घेतला आहे.यापूर्वी वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १० हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देण्यात येत होते. मात्र या कार्यक्रमात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहनपर अनुदान बंद करण्यात आले आहे. पूर्ण रक्कम १२ हजार रूपये स्वच्छ भारत अभियानासाठी केंद्र शासनाकडून मंजूर निधीतून देण्यात येणार आहे.जिल्हास्तरावर सल्लामसलत करून स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शौचालय आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांसाठी अधिकृत तंत्रज्ञान पर्याय मेन्यू स्वच्छ भारत मिशनद्वारे राज्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मिशन कार्यक्रमांतर्गत सहाय्य उपलब्ध असेल, किमान स्विकार्य तंत्रज्ञानाचा एक यादी प्रदान करेल. कोणत्याही वरिष्ठ तंत्रज्ञानाचा वापर लाभार्थी करू शकेल. त्यासाठी या बाबत होणारा खर्च लाभार्थ्याने करावयाचा आहे. सदर कार्यक्रमाकरिता आवश्यक निधीची तरतूद जिल्हा नियोजन व विकास परिषद अंतर्गत करण्यात यावी, अशा सूचना असून स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी नवीन बदलांसह २ आॅक्टोबर २०१४ पासून करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची ग्रामपंचायतस्तरावर योग्य तऱ्हेने अंमलबजावणी करून कार्यक्रमाचा उद्देश पूर्ण करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा, राहुल द्विवेदी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जि.प. भंडारा सुधाकर आडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
आता शौचालयासाठी १२ हजारांचे अनुदान
By admin | Updated: November 11, 2014 22:35 IST