प्रशांत देसाई भंडाराराष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या ग्राहकांनाही सुविधा देता यावे, यासाठी भारतीय पोस्ट विभागाने पुढाकार घेतला आहे. बँक ग्राहकांसारखी पोस्ट ग्राहकांना आता ‘एटीएम’ सुविधा मिळणार आहे. राजधानी मुंबईतील चेंबूर येथे राज्यातील पहिले ‘पोस्ट एटीएम’ सुरू झाले आहे. येत्या काही दिवसात राज्यातील ७५ पोस्ट कार्यालयात एटीएम प्रणाली कार्यान्वित होत आहे.भारतीय पोस्ट कार्यालयाची स्थापना १ आॅक्टोबर १८३७ मध्ये करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत १७७ वर्षांपासून पोस्ट विभागाची अविरत सेवा सुरु आहे. बँकेच्या तुलनेत डाक विभागाकडून मिळणाऱ्या सुविधा कमी असले तरी पोस्टसेवेला प्राधान्य देत आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यात ६७ लाख २२ हजार ४३१ बचत खातेधारक आहेत. सोबतच पुनरावृत्ती ठेव योजनेचे (आरडी) २ कोटी १३ लाख ९३ हजार ३९८, मासिक उत्त्पन्न योजनेचे १३ लाख २४ हजार ५२६, वृध्दापकाळ योजनेचे ८५ हजार २६०, वर्षभरासाठी डिपॉझिट करणारे १ लाख ५३ हजार १४० तर पीपीएफचे ४ लाख ६६ हजार २७३ खातेधारक आहेत. राज्यातील डाक विभागाने आता राष्ट्रीयकृत बँकेच्या स्पर्धेत राहता यावे, यासाठी राज्यातील सर्व पोस्ट कार्यालय कोअर बँकींग प्रणालीने जोडण्यात येत आहे. भंडारा येथील प्रधान डाकघर येथे कोअर बँकिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. कोअर बँकिंग प्रणालीमुळे पोस्टाच्या ग्राहकाला आता राज्यातील कोणत्याही पोस्ट कार्यालयातून पैशाचा व्यवहार करण्यासाठी सुविधा होणार आहे.
आता पोस्टाच्या ग्राहकांना मिळणार ‘एटीएम’ सुविधा
By admin | Updated: March 1, 2015 00:33 IST