अशोक पारधी पवनी खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध असावे या हेतूने राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाने तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती केली. निधीचा पुरवठा करुन भव्य इमारत व क्रीडांगण निर्माण केले. परंतु क्रीडा विभागाच्या तकलादू धोरणामुळे कोट्यवधी खर्चून तालुकास्तरावरुन एकही खेळाडू घडू शकला नाही. नियोजनाचा अभाव असल्याने बहुउद्देशिय सभागृहाचे काम गेल्या दोन वर्षापासून अपूर्ण आहे. क्रीडांगणावर माती भरणाशिवाय इतर काहीही होवू शकले नाही. तालुका क्रीडा संकुलासाठी सन २००४ ने मार्च २०१७ या साधारणत: बारा-तेरा वर्षाचे कालावधीत १ कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आलेली आहे. सुरुवातीला क्रीडा संकुलाची एक इमारत, क्रीडागंणाचे सपाटीकरण व आवारभिंत यासाठी ३० लाखापेक्षा अधिक रक्कम खर्च झाली. त्या इमारतीची देखभाल करणारी यंत्रणा नसल्यामुळे इमारतीचे दार व खिडक्यांची तावदाने यांची तोडफोड झाली. इमारत नादुरुस्त झाली परंतु खेळाडूंना त्याचा उपयोग होवू शकला नाही. त्या इमारतीला तसेच ठेवून त्या इमारतीच्या मागच्या बाजूला मोकळया जागेत भव्य असे बहुउद्देशिय सभागृह उभारण्यात आले. काम अर्धवट आहे परंतु त्यावर ३५ ते ४० लाख रु. खर्च झाल्याची माहिती आहे सदर इमारतीमध्ये इन-डोअर खेळ खेळता येईल अशी सुविधा निर्माण करावयाची होती ती अद्यापही करण्यात आलेली नाही. इमारतीच्या दर्शनी भागातील पोर्चचे काम सुध्दा अर्धवट आहे. सहा महिन्यात पूर्ण करावयाची इमारत तीन वर्षात पूर्ण होवू शकलेली नाही. इमारतीचे काम अपूर्ण आहे विद्युत सुविधा करण्यात आलेली नाही त्यामुळे त्या इमारतीचा उपयोग खेळांडूना होवू शकत नाही. इमारती शिवाय उर्वरीत जागेत ४० लक्ष रुपये खर्च करुन नहराचे खोदकाममधून बाहेर काढण्यात आलेली भिस प्रकारची माती टाकण्यात आलेली आहे खरे तर क्रीडांगणावर भिस ऐवजी भसवा प्रकारची मऊ असलेली माती टाकावयाची असते परंतु तसे करण्यात आलेली नाही. ४० लक्ष रुपयात क्रीडांगणाऐवजी जागेचे सपाटीकरण पून्हा करण्यात आलेले आहे. खेळाचा कोणताच प्रकार अशा मातीवर खेळता येवू शकत नाही. खेळाडूंसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात क्रीडांगण व्हायला हवे होते ते झालेले नाही. दौड प्रकारासाठी ट्रक सुध्दा तयार करण्यात आलेले नाहीत. क्रीडा संकुलाच्या दोन इमारती तयार आहेत. शासनाने जाहिर धोरणानुसार तालुका क्रीडा अधिकारी किंवा क्रीडा प्रशिक्षण नियुक्त केलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा युवा खेळाडूंना येथे कोण शिकविणार? हा प्रश्न उद्भवत आहे. तालुकास्तरावर क्रीडा संकुलात क्रीडा साहित्य उपलब्ध करण्यात आलेले नाहीत त्यामुळे हया संकुलात कोणत्या खेळाचा सराव करावा ही सुध्दा एक प्रश्नच आहे. तालुकास्तरावर क्रीडा समिती स्थापन करावयाची आहे परंतु तसे झालेले नाही. शासनाचा एवढा मोठा निधी क्रीडा धोरणावर खर्च होत असून एकही खेळाडू तयार होत नाही तरीही लोकप्रतिनिधी गप्प का? असा प्रश्न विचारला जात आहे.
कोट्यवधी खर्चून एकही खेळाडू घडला नाही
By admin | Updated: April 23, 2017 00:46 IST