पवनी : अवैध रेती तस्करीच्या चौकशीसाठी गेलेल्या तलाठ्याला रेती माफीयांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की करताना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली. यात एका नगरसेवकाचा समावेश आहे. या प्रकरणामुळे महसुल विभागात खळबळ उडाली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकताच पाच रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला. यामध्ये येनोळा, वलनी, जुनोना, गुडेगाव व ईटगाव यांचा समावेश आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच रेतीचा उपसा करावा, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र रेती तस्कर रात्रीला रेती चोरुन नेत आहेत. यामुळे या घाटावरुन रेतीमाफीयांचे ट्रक रेती वाहून नेण्यासाठी गर्दी करीत आहेत. नियमांची पायमल्ली करुन या घाटांवरुन रेतीची सर्रास वाहतूक केली जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर भरारी पथके तैनात करण्यात आले आहेत. एका भरारी पथकात तलाठी सिराज मेहबूब खान आहेत. सिराज खान यांनी गौतमनगर वॉर्डात सुरु असलेल्या अवैध रेती अड्यावर जाऊन रेती व्यावसायीक व नगरसेवक असलेले मसुद खान यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी तलाठ्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तलाठी सिराज खान यांनी पवनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून भादंवि ३५३, १४७, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करुन समूद खान, एजाज खान, शफीक खान, वसीम शेख, सुरेश रामटेके, ताफीक बेग, मतीन शेख, राजा बावनकर, संतोष ड्रायव्हर, कान्हा ड्रायव्हर, अजीम खान, शब्बाक शेख, वसिम शेख, हसीम शेख आदींना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी त्यांची जामीनावर सुटका केली. (शहर प्रतिनिधी)
मारहाणप्रकरणी नऊ रेती तस्करांना अटक
By admin | Updated: February 15, 2015 00:33 IST