ग्रामसभेमधून लाभार्थ्यांची निवड : तिरोडा तालुक्यातील प्रकारकाचेवानी : तिरोडा तालुक्यात ३४९ घरकूल प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले होते. यात ३१८ नव्याने मंजूर झाल्याने आता तिरोडा तालुक्यात ६६७ घरकूल तयार होणार आहेत.यापूर्वी ३४९ घरकूल मंजूर झाल्यावर जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी ही संख्या खूपच कमी असून घरकुलांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यात नव्याने ३१८ घरकूल मंजूर करण्यात आल्याने आता एकूण ६६७ घरकूल नव्याने तयार होणार आहेत. आॅनलाईन यादी आणि ग्रामसभेनुसार जी यादी तयार करण्यात आली, त्यानुसार तालुक्याला दोन हजार ते तीन हजार घरकूल मंजूर करणे अपेक्षित होते, असे मनोज डोंगरे यांनी सांगितले.तिरोडा तालुक्यात एकूण ९५ ग्रामपंचायत आहेत. ६६७ मंजूर घरकुलांमध्ये अनुसूचित जातीकरिता २१०, अनुसूचित जमातीकरिता ९७, ईतरांकरिता ३०६ आणि अल्पसंख्याककरिता ५४ घरकुलांचा समावेश आहे.आॅटो जनरेटेड लाभार्थी संख्येचा (आॅनलाईन यादी २०११ सर्वे नुसार) विचार केल्यास अनुसूचित जाती २ हजार ७८३, अनु जमाती २ हजार ०१०, ईतर १५ हजार ०९३ आणि अल्पसंख्याक ९५ असे एकूण १९ हजार ९८१ लाभार्थी संख्या काढण्यात आली होती. या यादीत ग्रामसभेमधून लाभार्थी निवड करण्याचे ग्रामपंचायतला कळविण्यात आले होते. आॅगस्टच्या ग्रामसभेत निवड करण्यात आले. यात अनेक ग्रामपंचायतमध्ये वाद निर्माण झाले होते. ग्रामसभेनुसार पं.स.ला यादी देण्यात आली. त्यानुसार अनुसूचित जाती १ हजार ३०४, एस.टी. १०६३, ईतर १२ हजार ६२१ आणि अल्पसंख्याक ५९ असे एकूण १५ हजार ०४७ लाभार्थ्यांची यादी पाठविण्यात आली. जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी सांगितले, ग्रामसभेच्या लाभार्थी संख्येनुसार मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांची संख्या पाहता ज्याप्रमाणे ‘उदो-उदो‘ करण्यात आला, त्याप्रमाणे जनतेची फसवणूक करण्यात आली. यापूर्वी तिरोडा तालुक्यात रमाई योजना, इंदिरा गांधी घरकूल योजनेंतर्गत एक हजाराच्या वर घरकूल मंजूर करण्यात आले होते.आजपर्यंत ईतर वर्गाच्या नागरिकांना घरकूल देण्यात येत नव्हते. आॅनलाईन यादीनुसार ईतर लाभार्थी १५ हजार ०९३ शोधले गेले. ग्रामसभेने या यादीत सुधारणा करुन १२ हजार ६२१ लाभार्थी असल्याची यादी दिली. या पाच अंकी संख्येच्या लाभार्थी संख्येपैकी केवळ ३०६ घरकूल मंजूर करण्यात आले. ही ईतर वर्गाची थट्टा नाही तर काय? असा सवाल जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी लोकमतजवळ व्यक्त केला.सन २०२० पर्यंत सर्वांना पक्के घर हे शासनाने ठरविले तर हे कसे शक्य होणार. येत्या पाच वर्षातही हे उद्दिष्ट पूर्ण होवू शकणार नाही, असेही जि.प. सदस्य डोंगरे म्हणाले. शासनाने ग्रामसभेच्या मागणीला पाहता घरकुलांच्या संख्येत वर्षाला लाभार्थ्यांच्या २० टक्के घरकूल मंजूर करणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. (वार्ताहर)ग्राम पंचायतीला दिलेल्या यादीत संभ्रमघरकुलांच्या लाभार्थी याद्या ग्रा.पं.ला पाठविण्यात आल्या. त्या याद्यानुसार घरकुले मंजूर नसून लाभार्थ्यांनी वेळेत आवश्यक अटी-शर्ती आणि कागदपत्रे मिळवून ठेवावेत याकरिता अधिकची यादी ग्रा.पं.ला पाठविण्यात आली आहे. प्रत्येक ग्रा.पं.ला ठरविल्याप्रमाणे घरकुल तयार करण्याची मंजुरी देण्यात येणार आहे, असे पंचायत समितीचे यु.एन. बिसेन यांनी सांगितले. ग्रा.पं.ला २५ ते ४० घरकुल लाभार्थ्यांची यादी मिळाल्याने नागरिकांत अनेक ग्रामपंचायतच्या सचिव व पदाधिकाऱ्यात संभ्रम निर्माण झालेला आहे. लाभार्थी यादीत ज्यांना यापूर्वी लाभ मिळालेला आहे आणि ज्यांचे नाव डबल यादीत आले असल्यास त्यांचे नाव वगळण्यात यावे, असेही सुचित करण्यात आले असल्याचे पं.स.सूत्रांनी सांगितले. चुकीचे लाभार्थी दिल्यास व त्यांना लाभ मिळाल्यास ग्रा.पं. आणि लाभार्थी या दोघांना जबाबदार धरण्यात येईल, असेही सूत्रांनी लोकमतला सांगितले.लाभार्थ्यांकडून योग्य कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. ६६७ लाभार्थ्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कामाचे बिल रोजगार सेवकाच्या माध्यमाने मस्टर पद्धतीने तयार होतील आणि तसे बिल काढले जातील. रोजगार सेवकाला या कामाचे वेगळे कमिशन किंवा मेहनताना देण्यात येईल.यु.एन. बिसेन,प्रभारी, घरकूल विभाग,पंचायत समिती तिरोडा.
नव्याने ३१८ घरकूल मंजूर
By admin | Updated: March 23, 2017 00:25 IST