स्थायी समितीची सभा : जिल्हा परिषदेत रंगतोय कलगीतुराभंडारा : जिल्हा परिषदेत सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रत्येक कामातून डावलत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यामंध्ये अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. परिणामी शनिवारला स्थायी समितीच्या सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बहिर्गमन करून काँग्रेसच्या धोरणांचा विरोध केला.जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या रूग्ण कल्याण समितीवर दोन अशासकीय सदस्यांची निवड करावयाची असते. त्यासाठी काँग्रेसने एक व राष्ट्रवादी काँग्रेसने एक असे दोन सदस्य पाठविण्याचे ठरविण्यात आले. मात्र, काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला डावलून मर्जीतील दोन सदस्यांना नामनिर्देशित केले. ही बाब काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दडवून ठेवली होती. आज शनिवारला स्थायी समितीच्या सभाध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षात सुरू झाली. यावेळी समितीच्या सदस्यांचे नामनिर्देशन झाल्याची माहिती नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य तथा रूग्ण कल्याण समितीचे सदस्य धनंजय तुरकर यांनी अध्यक्षांना सभा सुरू होताच हा प्रश्न विचारला. त्यावर अध्यक्षांनी समिती सदस्यांची नावे काही दिवसापूर्वीच पाठविली असून त्यात एक जिल्हा परिषद सदस्य तर साकोली येथील एक कार्यकर्ता असल्याचे सांगितले. त्यानंतर संतप्त झालेले कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांनी आक्षेप नोंदविला. सत्ताधारी असतानाही राष्ट्रवादी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता समिती सदस्यांची परस्पर नामनिर्देशन केल्यामुळे संताप व्यक्त करून ते सभागृहातून बाहेर पडले. हा प्रकार उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांना खटकल्यामुळे ते संताप व्यक्त करीत महिला व बाल विकास सभापती शुभांगी रहांगडाले व अन्य सदस्यांसह सभेतून बाहेर पडले. (शहर प्रतिनिधी)मनधरणीचा प्रयत्न दोनदा फसलाराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेतून बहिर्गमन केल्यानंतर सर्व सदस्य सभापती नरेश डहारे यांच्या कक्षात पुढील रणनीती ठरविण्यासाठी बसले. यावेळी काँग्रेसकडून त्यांची मनधरणीची दोनदा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कामात विश्वासात घेत नाही, असा आरोप करीत मनधरणीचा प्रयत्न फेटाळून लावला. त्यामुळे स्थायी समितीची आजची सभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशिवाय पार पडली. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. त्यामुळे प्रत्येक कामे विश्वासात घेऊनच करण्यात येतात. शासन परिपत्रकाप्रमाणे या समितीसाठी नावे पाठविण्यात आली. त्यात गैरसमज करण्याचे कारण नाही.- भाग्यश्री गिलोरकर, अध्यक्ष, जि.प. भंडारा.सत्तास्थापन करताना काँग्रेसने जो विश्वास दाखविला होता. तो आता त्यांनी तोडला आहे. केवळ दिखावा करण्यासाठी युती आहे. सत्तेत सहकारी असताना प्रत्येक कामातून डावलण्यात येत आहे. - राजेश डोंगरे, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, भंडारा.काँग्रेसने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याऐवजी अविश्वासाची भूमिका घेत आहे. विकासकामे असो किंवा नियोजन असो प्रत्येक कामातून डावलण्याच्या भूमिकेने सत्ता आत्मविश्वासाने चालत नाही.- नरेश डहारे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन, भंडारा.
काँग्रेसच्या अविश्वासाने राष्ट्रवादीचे बहिर्गमन
By admin | Updated: April 17, 2016 00:20 IST