बावनथडीचे पाणी सोडण्याची मागणी : बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही देणार निवेदनतुमसर : तालुक्यात पडलेल्या कमी पावसामुळे तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे जलपातळीने तळ गाठल्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. धरणात जलसाठा उपलब्ध असताना धरणाचे पाणी सोडल्या जात नाही आहे. परिणामी पाण्यावाचून सर्व शेतपिके नष्ट होत आहेत. ते रोखण्याकरिता राष्ट्रवादीतर्फे आंदोलन पुकारले जात असून ते पेटण्याचे चिन्ह दिसत आहेत. तालुक्यातील आष्टी, चिखला व गर्रा बघेडा जि.प. क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडल्याने ऐन पावसाळ्यात विहीर, तलाव कोरडे पडले होते. परिणामी शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर जमिन पडीतच ठेवल्या होत्या व अनेक गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी झाली. मात्र त्यात फक्त १२ गावांचा समावेश करण्यात आला. परंतु त्या शेतकऱ्यांना कसलीही मदत अजूनपर्यंत मिळाली नाही. शेतकरी खचून न जाता त्यांनी बावनथडी नदीच्या काठावरील शेतीचे उसाचे उत्पादन घेतले. मात्र नदी कोरडी पडली असून नदीची जलपातळीही कमी झाल्याने नदीतल्या विहिरी आटल्या. त्यामुळे ऊसाच्या शेतीला पाणी मिळणे कठीण झाल्याने ऊसाचे पिक करपले आहेत. पावसाने दगा दिल्याने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना बावनथडी धरणात पाण्याचा साठा उपलब्ध असताना ते शेतकऱ्यांकरिता सोडल्या जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचे चित्र परिसरातील चांदमारा, लोभी, नाकाडोंगरी, आष्टी, पाथरी, धुटेरा, कवलेवाडा, चिखला, सीतसावंगी, हमेशा, घानोड, चिचोली, मोकोटोला, सोदेपूर, गोबरवाही, पवनारखारी, सुंदरटोला, येदरबुची या गावात दिसून येत आहे.गोबरवाहीची पाणी पुरवठ्याचा जलसाठाही आटला. सन १९६९-७० मध्ये बावनथडी नदीत पाथरी घाटावरजि.प. भंडारा तर्फे गोबरवाही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली. या योजनेमार्फत नाकाडोंगरी, राजापूर, हमेशा, सीतासावंगी, सुंदरटोला, पवनारखारी, हमेशा, गोबरवाही आदी गावांना ३७ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र यावर्षी पडलेला कमी पावसामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे नदी कोरडी पडल्याने एप्रिल महिन्याच्या मध्यंतरीच ३ टक्के जलसाठा उपलब्ध असल्यामुळे मे मध्ये पिण्याचे पाणी मिळणेही कठीण होणार आहे. जर बावनथडी धरणाचे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागणार नाही. मात्र धरणाचे पाणी सोडण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे राष्ट्रवादीतर्फे जि.प. सदस्य संगीता मुंगुसमारे, संगीता सोनवाने व शुभांगी रहांगडाले या रनरागिणी बनून पुढे येत त्यांनी आंदोलनाची चेतावनी दिली. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपवून तेथील शेतकऱ्यांनाही आंदोलनात सहभागी करणार असल्याचे राष्ट्रवादीतर्फे आंदोलन पेटणार एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)
पाण्यासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन पेटणार
By admin | Updated: April 19, 2016 00:32 IST